तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना तुळजाभवानी मंदिरात प्रवेश नाही

धाराशिव : तुळजाभवनी मंदिरात अंगदर्शन करणारे तसेच तोकडे कपडे घालणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. मंदिर प्रशासनाने या संदर्भात मंदिर परिसरात फलक लावले आहेत. तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी गुरुवारी एक नियमावली जाहिर करण्यात आली आहे.अंग प्रदर्शक, उत्तेजक, असभ्य व अशोभनीय वस्त्रधारी तसेच हाफ पँट, बर्मुडा परिधान करणाऱ्या नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे फलक मंदिर परिसरात लावले आहेत. कृपया भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचं भान ठेवा, अशी विनंतीही फलकाद्वारे केली आहे.त्यामुळे आता मंदिरात प्रवेश करणाऱ्या भाविकांनी विशेष काळजी घ्यावी.मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतल्याबद्दल पुजारी वर्गाकडून मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार सौदागर तांदळे, सहाय्यक व्यवस्थापक नागेश शितोळे यांचा सत्कार करण्यात आला होता. दरम्यान मंदिराच्या या नियमावर अनेकांनी प्रतिक्रीया दिली आहे. काहींना हा निर्णय योग्य वाटतो तर काहींना हा निर्णय अयोग्य वाटतो. कोणी कसे कपडे घालावेत हे व्यक्तिस्वातंत्र्य सर्वांना आहे अशी प्रतिक्रिया भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने