आहारवेद: नियमित ताक प्या, व्याधिमुक्त व्हा!

महाराष्ट्र : दह्यामध्ये पाणी घालून घुसळून ताक तयार केले जाते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ताक हे महत्त्वपूर्ण औषधी पेय आहे.

‘आहारामध्ये ताकाचे नियमितपणे सेवन करणारा मनुष्य सर्व व्याधींपासून मुक्त राहतो. तसेच जे रोग बरे झाले आहेत, ते ताकाच्या सेवनामुळे पुन्हा उद्भवत नाहीत’ अशी ताकाची महती वर्णन केलेली आहे. मराठीमध्ये ‘ताक’, हिंदीमध्ये ‘छाछ’, संस्कृतमध्ये ‘तक्र’, तर इंग्रजीमध्ये ‘बटर मिल्क’ (Butter Milk) या नावाने ओळखले जाते.
औषधी गुणधर्म :

तक्रं लघु कषायाम्लं दीपनं कफवातजित्। तद्वन्मस्तु सरं स्रोतः शोधि विष्टम्भजित् लघु ॥

अष्टांग संग्रह सूत्रस्थान ६ / ६६

तक्रं मधुरमम्लं कषायानुरसउष्णवीर्यं लघुरुक्षमग्निदीपनं … मधुरविपाकं हृद्यं मूत्रकृच्छ्रस्नेहव्यापत् प्रशमनमवृष्यं च ॥

सुश्रुत सूत्रस्थान ४५

आयुर्वेदानुसार : ताक मधुर, आंबट चवीचे असून, त्याचा विपाक मधुर व उष्ण वीर्यात्मक आहे. ताक पचायला हलके असून, भूक वाढविणारे असते. अंगावर सूज येणे, जुलाब होणे, मूळव्याध, संग्रहणी, तोंडाला चव नसणे, पंडुरोग, उलटी, मळमळ, विषमज्वर अशा अनेक आजारांमध्ये उपयोगी आहे. स्निग्ध पदार्थ खाल्ल्याने निर्माण झालेल्या आजारांमध्ये ताकाचा वापर फायदेशीर ठरतो.

आधुनिक शास्त्रानुसार : ताकामध्ये उष्मांक, कर्बोदके, प्रथिने, कॅल्शिअम, लॅक्टोबॅसिलस हे औषधी गुणधर्म विपुल प्रमाणात असतात.

उपयोग :

१. गोड ताक पित्तनाशक असून बलकारक असते, त्यामुळे पित्ताच्या तक्रारी असणाऱ्यांनी आहारामध्ये रोज एक ग्लास ताक नियमित प्यावे.

२. अरुची, भूक न लागणे, वारंवार जुलाब होणे, पोटात गॅस होणे, छाती व पोटात जळजळ होणे, हातापायांची आग होणे, वारंवार तहान लागणे या विकारांवर नियमितपणे गोड ताक प्यावे.

३. ताक हे वातनाशक असून, उष्ण वीर्यात्मक असल्याने ताक पिल्यानंतर आतड्यांचे आकुंचन-प्रसरण जास्त प्रमाणात होऊन शरीरातील मल पुढे ढकलला जाऊन सर्व मलदोष शौचावाटे बाहेर पडतात.

४. टायफॉईडमध्ये पोटात उष्णता निर्माण होऊन कधीकधी आतड्यांना व्रण निर्माण होतात. अशावेळी ताक प्यायले असता आतड्यातील व्रण कमी होऊन शरीराचा दाह बरा होतो.

५. अति प्रमाणात घेतलेल्या आहारामुळे शरीरामध्ये आम निर्मिती होते व या आमामुळे अनेक आजारांची निर्मिती होते. असे आमज विकार दूर करण्यासाठी ताक अत्यंत उपयुक्त असते. ताकामुळे आम दोषातील चिकटपणा दूर होऊन तो बाहेर ढकलला जातो व ताकातील आंबटपणामुळे आमज दोष सहज पचून शौचावाटे बाहेर पडतात.

६. गायीच्या दुधापासून बनविलेल्या ताकामुळे हृदयविकार दूर होतात. रक्तवाहिन्यांमधील रक्त शुद्ध होऊन शरीरातील वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते.

७. गोड ताजे ताक प्याल्याने रक्त शुद्ध होऊन शरीरास बळ मिळते. त्वचेचा वर्ण उजळून कांती निर्माण होते. मनास प्रसन्नता निर्माण होते.

८. लघवीचे प्रमाण कमी होऊन लघवी होताना त्रास जाणवत असेल, तर ताकात गूळ घालून प्याल्यास लघवी साफ होते.

९. लहान बालकांना पोटामध्ये जंत झाले असतील तर अर्धा चमचा वावडिंगाचे चूर्ण ताकातून सलग तीन दिवस प्यायला दिल्यास कृमी शौचावाटे पडून जातात.

१०. केस कोरडे होऊन तुटत असतील, तर ताकाने केस धुतल्यास केस मऊ व चमकदार होतात.

११. चेहरा काळवंडणे, मुरमाचे डाग व चेहऱ्याचा चिकटपणा कमी करण्यासाठी ताकाने चेहरा धुवावा. याने चेहरा तेजस्वी आणि आकर्षक होतो.

१२. ताकामध्ये ‘ब’ जीवनसत्त्व असल्यामुळे त्याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्वचेचे आरोग्य सुधारून सौंदर्य टिकून राहते.

१३. वार्धक्य टाळून तारुण्य टिकविण्यासाठी आहारामध्ये नियमित ताकाचे सेवन करावे. याने त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होऊन त्वचेचा रंग उजळ होतो.

१४. शरीराचा बांधा सुडौल राहण्यासाठी जेवण करताना पाण्याऐवजी ताकाचे सेवन करावे. याने घेतलेल्या आहाराचे पचन सुरळीत होऊन वजन आटोक्यात राहते.

१५. ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढून विविध आजारांची लागण रोखली जाते. तसेच पचनसंस्थेच्या तक्रारी उद्भवत नाहीत.

१६. शरीरात चांगल्या कोलेस्टेरॉलची निर्मिती होऊन हृदयरोग टाळण्यासाठी नियमितपणे रोज दोन ग्लास ताक प्यावे.

१७. आयुर्वेदामध्ये ताकाचे पुढील प्रकार सांगितले आहेत. १) तक्रं, २) उश्वित, ३) मथित, ४) दंडाहत / कालशेय, ५) करकृत, ६) श्वेतमंथ, ७) मलिन घोल आणि ८) खांडव. याच्या वेगवेगळ्या गुणधर्माप्रमाणे त्याचा विविध रोगांवर उपयोग केला जातो.

१) तक्रं – विरजण लावून तयार झालेल्या दह्यात पाणी घालून घुसळल्यावर त्यातील लोणी काढावे. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या ताकात एक चतुर्थांश पाणी घालावे. यालाच तक्रं किंवा ताक असे म्हणतात. हे बलवर्धक व ग्राही गुणधर्माचे असते.

२) उदश्वित – अर्धे पाणी मिळसलेल्या ताकास उश्वित म्हणतात. ते कफकारक, बलवर्धक व आमनाशक असते.

३) मथित – केवळ घुसळलेले दही. यामध्ये पाणी घालत नाहीत. हे त्रिदोषघ्न असून उष्ण असते. जुलाब, अर्श व संग्रहणीवर मठ्ठा (मथित) हितकारक असतो.

४) दंडाहत / कालशेय: हे दोनही प्रकार म्हणजे लांब दांड्याच्या रवीने कमी-अधिक वेळ घुसळून तयार केलेले ताक.

५) करकृत – यामध्ये रवीचा वापर न करता हाताने घुसळून तयार केलेले ताक म्हणजे करकृत होय.

६) श्वेतमंथ ज्या ताकाचा फेस पांढराशुभ्र आहे, त्याला श्वेतमंथ म्हणतात. –

७) मलिन / घोल – घुसळून तयार केलेले ताक.

८) खांडव – फळांच्या तुकड्यांसह असलेल्या ताकाला खांडव असे म्हणतात.

१८. ताकापासून कढी बनविली जाते. ती अत्यंत स्वादिष्ट व पाचक असते. जेवणाची रुची वाढविते.

ताकापासून लस्सी बनविली जाते. लस्सीत बर्फाऐवजी थंड पाण्याचा वापर केल्यास ते शरीरास अधिक हितावह होते. ही लस्सी पित्त, दाह, तृष्णा, शरीरातील उष्णता कमी करते. उन्हाळ्यामध्ये रोज दुपारी लस्सी प्यायल्यास उष्णतेचा त्रास जाणवत नाही. ताकावरील पाण्याच्या निवळीला ‘तक्रमस्तु’ असे म्हणतात. ही गुणाने अतिशय लघु असून, ज्यांची पचनशक्ती मंद झाली आहे, अशा रुग्णांनी पचनशक्ती वाढविण्यासाठी या निवळीचा वापर करावा.

सावधानता :

रात्री दुधात एक चमचा दही टाकून विरजण लावावे व सकाळी तयार झालेल्या दह्यापासून बनलेल्या ताज्या ताकाचाच आहारामध्ये वापर करावा. खूप जुने, अति आंबट ताक प्यायल्यास सर्दी, खोकला, दमा, शीतपित्त, आम्लपित्त असे विकार होऊ शकतात. म्हणून नेहमी ताज्या ताकाचाच आहारात वापर करावा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने