बैलगाडी शर्यतींना परवानगीचे स्वागत, गावगाडय़ात पुन्हा उत्साह

 कोल्हापूर : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या निर्णयाचे सर्वत्र जोरदार स्वागत केले जात आहे. या निर्णयामुळे गावगाडय़ात पुन्हा बैलगाडा शर्यतींची धूम सुरू होणार असून शेतकरी, बैलगाडी मालक यांच्यात उत्साहाचे वारे संचारले आहे. शर्यतीवरील बंदीमुळे सुतार, लोहार, शिकलगार, नालबंद यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता, आता या बारा बलुतेदारांच्या कमाईची सोय झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बैलगाडी शर्यतीला सर्वोच्च न्यायालयाने दशकभराने हिरवा झेंडा दाखवला असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

प्राणिमित्रांनी दाखल केलेल्या याचिकेबाबत शेतकऱ्यांनी आपण बैलांना किती आपुलकीने, प्रेमाने जपतो हे शासनदरबारी पटवून दिले आहे. पश्चिम महाराष्ट्रात मॅरेथॉन व पट्टा अशा दोन पद्धतीने शर्यतीचे आयोजन केले जाते. सध्या यात्रा, उरुस, जयंती, जत्रा, उत्सव सुरू आहे. अनेक गावात हजारापासून ते लाखापर्यंतच्या बक्षिसांच्या शर्यतीचे आयोजन केले जात आहे. सध्या बैलगाडा शर्यती सुरू झाल्याने यावर अवलंबून असणारे हॉटेल, टपरी, छोटा व्यवसाय करणारे सर्वानाच काम मिळणार आहे. या निर्णयाने बैलांच्या संख्येमध्ये वाढ होईल.

बैलगाडा शर्यतीला मान्यता हा राज्यातील शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा विजय आहे. मुख्यमंत्री  असताना बैलगाडा शर्यती सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र काहींनी त्याविरोधात याचिका दाखल केली. त्यामुळे यासंदर्भात शास्त्रीय समिती  स्थापन केली. या  समितीने बैल हा धावणारा प्राणी आहे असा अहवाल दिला. आमदार महेश लांडगे आणि राहूल कूल यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले.

– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी अखेर कायमची उठवल्याने बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यत हा क्रीडा प्रकार ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे .याखेरीज खिल्लार या देशी गोवंशाची यामुळे जपणूक होणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीची जपणूक होणार आहे. या निर्णयाबद्दल न्यायालयाचे मनापासून आभार.

– सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने