कोल्हापूर : येथील छत्रपती शिवाजी चौक परिसरातील दुकाने व घरांना मंगळवारी भीषण आग लागली. सुमारे सहा दुकाने व दोन घरांना आग लागल्याचे प्राथमिक वृत्त होते. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत होते. आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
छत्रपती शिवाजी रोड हा कोल्हापुरातील मध्यवर्ती, वर्दळीचा परिसर आहे. येथील एका कपडे शिवण्याच्या दुकानाला आग लागली. ती पसरत मागील बाजूस असलेल्या कापड व प्लॅस्टिक खेळणी दुकानाकडे सरकली. येथे ज्वलनशील वस्तू असल्याने आगीची तीव्रता वाढली. शेजारी असलेल्या दोन घरांनाही आग लागली होती. सहा दुकाने व दोन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. आगीचे लोळ दूरवरून दिसत असल्याने येथे बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना तेथे पोहोचून आज मिटवताना शर्तीचे प्रयत्न करावे लागत होते. आठ बंब दाखल झाले होते. आग विझवण्याचे प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते.