दक्षिण मुंबईत हातगाड्यांना बंदी ! दुकानदार आणि कामगार नाराज

मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसांनी दक्षिण मुंबईत सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ४ ते ८ या वेळेत हातगाड्यांमधून माल उतरवण्यास आणि भरण्यास बंदी घातली आहे.कारण हातगाडी चालकांमुळे वाहतूक कोंडी असून वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.पोलिसांनी घातलेल्या या निर्बंधामुळे परिसरातील दुकाने आणि हातगाडी चालक कामगार मोठा परिणाम होणार असल्याने त्यांच्यामध्ये नाराजी दिसत आहे.आपली नाराजी व्यक्त करताना काही दुकानमालकांनी सांगितले की,यामुळे आमच्या ठराविक व्यवसायाचे नुकसान होणार आहे.मनीष मार्केटमधील प्लास्टिक किरकोळ विक्रेते जगदीश मर्चंट म्हणाले की, ट्रक आणि इतर माल वाहनांसाठी हातगाड्या हा स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्याय आहे.माल वाहतूक करण्यासाठी वाहन वापरणे म्हणजे इंधन, ड्रायव्हर आणि लोडरसाठी पैसे देणे महाग होते.शिवाय मार्केटच्या गल्लीबोळात पार्किंगची समस्या आहे आणि हातगाडी बंदीमुळे वाहन वापरल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल.
दरम्यान, वाहतूक पोलिसांनी सांगितले की, हातगाडीच्या वाहतुकीमुळे दोन्ही बाजूला लहान लहान दुकाने असलेल्या अरुंद रस्त्यांवर अडथळे निर्माण होतात. त्यामुळे ठराविक वेळेत दक्षिण मुंबईतील ४० रस्त्यांवर हातगाडींना परवानगी दिली जाणार नाही.त्यामध्ये मादाम कामा रोड,अब्दुल रहमान स्ट्रीट, पी डीमेलो रोड,मोहम्मद अली रोड, सर जेजे रोड,ऑगस्ट क्रांती रोड,डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड आणि महर्षी कर्वे रोड आदी काही प्रमुख रस्त्यांचा समावेश आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने