२ हजार रुपयांच्या नोटा आजपासून म्हणजेच २३ मेपासून बँकांमध्ये बदलता येणार आहे. नोटा बदलण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होण्याआधीच एचडीएफसी बँकेनं आपल्या ग्राहकांना मेल करून सल्ला आणि नोटीस बजावली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या २००० रुपयांच्या नोटेबाबत तुम्हाला अपडेट करू इच्छितो, असेही एचडीएफसी बँकेनं मेलमध्ये सांगितलं आहे.
२ हजार रुपयांची नोट लीगल टेंडर राहणार आहे. तुम्ही तुमच्या सर्व व्यवहारांत ती वापरू शकता. तसेच तिला पेमेंटच्या स्वरूपातही वापरता येणार आहे. ग्राहक ३० सप्टेंबर २०२३पर्यंत कोणत्याही एचडीएफसी बँकेच्या शाखेत सहज २ हजार रुपयांची नोट जमा करू शकणार आहेत. बँक २३ मे २०२३ ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत एचडीएफसी बँकेच्या कोणत्याही शाखेत आपले पैसे जमा करू शकतात किंवा नोटा बदलून घेऊ शकतात.
तसेच २ हजार रुपयांची नोट जमा करण्यासाठी कोणतेही आयडी किंवा स्लिपची गरज नाही. २२ मे रोजी सर्क्युलर जारी करून आरबीआयनं बँकांनासुद्धा ग्राहकांना नोटा बदलण्यासाठी चांगल्या पद्धतीची सेवा देण्याचा सल्ला दिला आहे. आरबीआयचा २००० रुपयांची नोट आणण्याचा उद्देश पूर्ण झाला आहे. २००० रुपयांच्या नोटा बदलून त्या जमा केल्या जातील, यासाठी चांगली प्रणाली कार्यरत आहे. जेणेकरून सामान्य लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. यासाठी बँकांना पूर्णपणे तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असंही आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितलं.
नोटाबंदीनंतर काढलेल्या नोटांची भरपाई करण्यासाठी २००० रुपयांच्या नोटा बाजारात आणल्या गेल्या. आता बाजारात अधिक मूल्यांच्या नोटांची कमतरता नसल्याने त्या वितरणातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २००० रुपयांची नोट कायदेशीर निविदा राहील आणि ती ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत बँकांमध्ये सहजपणे जमा केली जाईल आणि बदलली जाऊ शकते, असंही त्यांनी सांगितलं.
एचडीएफसीच्या मेलमध्ये नेमकं काय म्हटलंय?
प्रिय ग्राहक,
एचडीएफसी बँकेवर तुमचा विश्वास आणि सुविधा आमच्यासाठी सर्वतोपरी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने जारी केलेल्या २००० रुपयांच्या नोटांबद्दल आम्ही तुम्हाला अपडेट करू इच्छितो.
कायदेशीर निविदा हमी : २००० रुपयांची नोट कायदेशीर निविदा राहील. तुम्ही ती तुमच्या सर्व व्यवहारांसाठी वापरू शकता आणि पेमेंटच्या स्वरूपातही तिचा वापर करू शकता.
राखीव ठेव : तुम्ही ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत HDFC बँकेच्या कोणत्याही शाखेतील तुमच्या खात्यात २ हजारांच्या कितीही नोटा सोयीस्करपणे जमा करू शकता.
सुलभ एक्सचेंज : आम्ही २३ मे २०२३ पासून ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत कोणत्याही HDFC बँकेच्या शाखेत एक अडचणीशिवाय विनिमय सेवा देत आहोत. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या २ हजारांच्या नोटा बदलून मिळू शकणार आहेत.
तुमचा विश्वासच आम्हाला ताकद देतो. HDFC बँक निवडल्याबद्दल धन्यवाद