दिल्लीचे तापमान ४६.३ अंश सेल्सिअसवर; उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, बिहार, पश्चिम बंगालमध्येही उष्णतेची लाट

नवी दिल्ली : दिल्ली आणि राजधानी परिक्षेत्रात (एनसीआर) उष्णतेची लाट कायम असून सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी, नजफगड भागामध्ये कमाल तापमान ४६.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. उन्हाळय़ातील सरासरी तापमानापेक्षा ते तीन अंशांनी अधिक होते. पुढील काही दिवस उत्तरेकडील राज्यांमध्ये उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना सहन कराव्या लागतील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
दिल्लीसह हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये उष्णतेची लाट असून पारा सुमारे ४५ अंशांपलिकडेच राहण्याची शक्यता आहे. सलग दोन दिवस कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त राहिले तर त्याभागात उष्णतेची लाट असल्याचे हवामान खाते घोषित करते. दिल्लीमध्ये सोमवारी सरासरी कमाल तापमान ४३ अंश तर, किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहिले. सफजरजंग, पालम, लोधी रोड, रिज, आयन नगर अशा दिल्लीच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये तापमान ४३ ते ४५ अंशांपर्यंत राहिले.

राजस्थानच्या पठारी भागांतून आलेले उष्ण वारे २५-३५ किमी वेगाने वाहत होते. या उष्ण लाटांमुळे दिल्लीकरांची काहिली होत असून गेले तीन-चार दिवस दुपारच्या वेळी रस्ते ओस पडलेले दिसत होते. पुढील दोन दिवस तरी तापमानात उतार पडण्याची शक्यता नसून २४ मे नंतर मात्र दोन-तीन दिवस पावसामुळे वातावरणात किंचित बदल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने