वादळी वाऱ्याने झाडे कोसळल्याने कोल्हापूर-सांगली महामार्गावरील वाहतूक ठप्प

कोल्हापूर : वादळी वारे आणि रिमझिमता पाऊस याच्या फटका बसल्याने झाडे उन्मळून पडल्याने कोल्हापूर – सांगली महामार्गावरील वाहतूक गुरुवारी सायंकाळी ठप्प झाली होती. उदगाव (ता. शिरोळ) ते अंकली (ता. मिरज) यादरम्यान असलेल्या कृष्णा नदीच्या अंकलीकडील पुलावर वाहने चार तासाहून अधिक काळ खोळंबून राहिल्याने वाहनधारक, प्रवाशांची कोंडी झाली. सायंकाळी साडेसहा नंतर वाहतूक पूर्वपदावर आली.


गुरुवारी दुपारी तीन वाजता जोरदार वादळी वारे सुटले. पावसाच्या हलक्या सरी बरसू लागल्या. शिरोळ तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे जमीनदोस्त झाली. कृष्णा नदीच्या अंकलीकडील बाजूला असलेल्या पुलाजवळ वादळी वाऱ्याचा फटका बसून सहा झाडे उन्मळून पडली. परिणामी कोल्हापूर – सांगली महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. कोल्हापूरच्या बाजूला ५ किलोमीटर तर सांगलीच्या बाजूला ४ किलोमीटर इतक्या दूरच्या अंतरावर वाहतूक ठप्प झाली होती. जयसिंगपूर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पडलेली झाडे बाजूला केली. नंतर वाहतूक कोंडीतून मार्ग निघाल्याने वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने