ऐतिहासिक पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम एकजुटीचे दर्शन, गावकऱ्यांनी दाखवून दिलं सलोखा काय असतो...

कोल्हापूर / पन्हाळा : शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक पन्हाळगडावरील एका मजारची मध्यरात्री अज्ञाताने नासधूस केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऐतिहासिक मजार असलेल्या पन्हाळगडावरील या घटनेनंतर हिंदू मुस्लिम बांधवांनी आज पन्हाळा बंदची हाक दिली होती. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा पोलीस दलाकडून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामाजिक सलोखा राखत ही मजार पुन्हा उभी केली. आणि सर्वांसमोर एकजुटीचा आणि एकोप्याचा आदर्श ठेवला. आता या सलोख्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर या मजारीबाबत अक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल होत होता. बुधवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने मजारची नासधूस केल्याचा प्रकार समोर आला. यानंतर पन्हाळगडावरील हिंदू मुस्लिम बांधवांनी तासाभरातच ही मजार पुन्हा उभी केली. पन्हाळ्यावरील हिंदू मुस्लिम बांधवांनी जोपासलेली सामाजिक बांधिलकी यावेळी पाहायला मिळाली.

सोशल मीडियावर पोलिसांचा 'वॉच'
मजारची नासधूस झाल्याने याबाबतचा मजकूर सोशल मीडियावर प्रसारित होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गुरुवारी पन्हाळगडावर पर्यटकांना जाण्यासाठी मज्जाव केला. कोणत्याही प्रकारचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होऊन दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेत पोलीस प्रशासन सतर्क असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.

अफवांवर विश्वास ठेवू नका- बलकवडे

सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल असे मजकूर प्रसारित झाल्यास ते प्रसारित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू, तसेच पन्हाळा घटनेबाबत अफवा फसवणाऱ्यांचाही पोलीस योग्य तो बंदोबस्त करतील. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने