नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचा १६वा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या लीगमध्ये आतापर्यंत ५६ सामने खेळले गेले असून आता फक्त १४ सामने शिल्लक आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे आतापर्यंत एकही संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचलेला नाही.
आज गुजरात आणि मुंबईच्या संघामध्ये सामना
आयपीएलमध्ये आज हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्स आणि रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ आमनेसामने असतील. या सामन्यात गुजरातचा संघ विजयी झाल्यास प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरेल. दुसरीकडे, मुंबई जिंकल्यास राजस्थानला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकावर येईल. सध्या गुजरात १६ गुणांसह पहिल्या तर मुंबई १२ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
चेन्नई दुसऱ्या तर राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे
महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ १२ सामन्यांत १५ गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला उर्वरित दोनपैकी एक सामना जिंकावा लागेल. दुसरीकडे चेन्नईचा संघ दोन्ही सामने हरला तर त्याला इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
लखनौ आणि बंगळुरूला संधी
लखनौ सुपर जायंट्सचा संघ ११ सामन्यांत ११ गुणांसह पाचव्या तर आरसीबी ११ सामन्यांत १० गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांचे उर्वरित ३-३ सामने जिंकावे लागतील.
मात्र, अद्याप कोणताही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. पण दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना टॉप-४ मध्ये पोहोचणे जवळजवळ अशक्य आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जने त्यांचे उर्वरित तीनही सामने जिंकल्यास ते पात्र ठरतील.