सार्वजनिक रुग्णालयांतील रुग्णसंख्या घटली; पण जे.जे. रुग्णालयात पेशंट कसे वाढले ?

मुंबई : मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयांमध्ये केवळ शहरातून नाही तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण वैद्यकीय उपचारांसाठी येत असतात. मात्र करोना संसर्गानंतर जे. जे रुग्णालय वगळता सेंट जॉर्जेस, जीटी, कामा रुग्णालयातील ओपीडी तसेच उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णसंख्येमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी घट झाली आहे. जेजेवरील ताण सातत्याने वाढत असला तरीही अन्य रुग्णांना सामावून घेणाऱ्या या इतर तीन रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या कमी का होत आहे, याचा शोध घेण्याचे निर्देश संबधित रुग्णालयांना देण्यात आले आहे.

स्त्रीरोग, बालआरोग्य व प्रसूतीसाठी प्रसिद्ध असलेल्या कामा रुग्णालयामध्ये मागील काही महिन्यात दिवसांमध्ये घट झाली आहे. पाच ते सहा वर्षांपूर्वी पाच ते सहा हजार प्रसूती होत असत. आता वर्षाला ही संख्या दोन ते अडीज हजार इतकी झाली आहे. या परिसरात नव्याने झालेली नर्सिंग होम्स, छोटी खासगी रुग्णालये तसेच वस्त्यांमधील वैद्यकीय उपचारकेंद्रामुळे ही संख्या रोडावल्याची शक्यता रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी व्यक्त केली. यावर उपाय म्हणून रुग्णालयामध्ये तीनशे, सहाशे आणि आठशे रुपये दर असलेल्या खासगी वॉर्डची सुविधा आता उपलब्ध करण्यात आली आहे. रुग्णांच्या वैद्यकीय गरजा व आवडीनिवडी बदलत्या असल्यामुळे त्यांना आकृष्ट करण्यासाठी या सुविधेच्या उपलब्धतेनंतर रुग्णालयामध्ये पुन्हा रुग्णांची वर्दळ वाढेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.
सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये ५०० खाटांची उपलब्धता आहे. त्यापैकी २०० ते २२० खाटा या रुग्णव्याप्त असायच्या. हे करोना रुग्णालय म्हणून घोषित केल्यानंतर रुग्णसंख्येमध्ये घट झाली. संसर्गाच्या धास्तीने रुग्णांनी येथे पाठ फिरवली, हे कारण प्रामुख्याने दिले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, या रुग्णालयामध्ये स्त्री रोगावरील उपचारासाठी सुसज्ज अशी वैद्यकीय उपलब्धता आहे. त्यामुळे हा विभाग येथे पूर्णक्षमतेने सुरू करता येणे शक्य आहे. करोना काळात युरोलॉजी तसेच प्लास्टिक सर्जरी हे विभाग जेजे रुग्णालयामध्ये नेण्यात आले. जीटी रुग्णालयामध्येही व्यसनमुक्ती केंद्रासह नुकतेच तृतीयपंथीयांसाठी विशेष उपचार विभाग सुरू करण्यात आला. आयव्हीएफ केंद्र कामा रुग्णालयामध्ये सुरू करण्यात येणार आहे. खासगी रुग्णालयामध्ये असलेल्या वैद्यकीय सेवांच्या तोडीसतोड सुविधा देण्याचा प्रयास या रुग्णालयांमध्ये केला जात आहे.

बायोमेट्रिकची सक्ती

डॉक्टरांनी वेळेवर रुग्णालयात उपस्थित राहावे, यासाठी या रुग्णालयांमध्ये आता बायोमेट्रिक उपस्थिती ही अनिवार्य करण्यात आली आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही संख्या कमी होण्यामागे विविध प्रकारची कारणे आहे. निवासी डॉक्टरांवर रुग्णसेवेचा पूर्ण भार टाकता येत नाही. अनेक रुग्णांना विभागप्रमुखांनी रुग्णालयामध्ये उपस्थित असावे, ही माफक अपेक्षा असते. रुग्णालयामध्ये ज्या वैद्यकीय सुविधा दिल्या जातात, त्यांचा पूर्ण क्षमतेने वापर होणे गरजेचे आहे. या सुविधा, चाचण्या जर वेळेवर मिळाल्या नाही तरीही रुग्ण हवालदिल होतात व रुग्णसेवेकडे पाठ फिरवतात.

नव्या सुविधांची गरज

रुग्णसंख्या कमी झालेल्या सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये थॅलेसेमिया रुग्णांसाठी उत्तम वैद्यकीय सेवा दिली जाते. त्याच क्षमतेने इतर सुविधाही सुरू करता येणे शक्य आहे. या तिन्ही रुग्णालयांमध्ये राजकीय व सामाजिक संदर्भाने वैद्यकीय उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सर्वसामान्यांपर्यंत या रुग्णालयांचे महत्त्व व तिथे देण्यात येणाऱ्या सुविधांची उपलब्धतेसंदर्भात माहिती मिळाली तर रुग्णालयांमध्ये सामान्यांचा ओढा वाढेल. विविध प्रकारचे विकास प्रकल्प, जागांना मिळालेले वाढते दर यामुळे शहरातील राहत्या जागा विकून उपनगरामध्ये स्थलांतरित होणाऱ्या सामान्यांची संख्या वाढती आहे. त्याचाही परिणाम रुग्णसंख्येमध्ये घट होण्यात झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने