मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! जोफ्रा आर्चर आयपीएल २०२३ मधून बाहेर; ‘या’ अष्टपैलू खेळाडूला मिळाली संधी

मुंबई : आयपीएल २०२३ मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगणार आहे. मात्र, याआधीच रोहितच्या पलटणला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर फिटनेसच्या समस्येमुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. पाचवेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईने सांगितले की आर्चर इंग्लंडला परतणार आहे आणि तो इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या देखरेखीखाली असेल. यासोबतच आर्चरच्या बदलीची घोषणाही मुंबईने केली आहे.

मुंबईने सांगितले की, आर्चरच्या रिकव्हरी आणि फिटनेसवर ईसीबीकडून लक्ष ठेवले जात आहे. त्याच्या रिहॅबवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तो घरी परतेल. मुंबईने आर्चरच्या जागी इंग्लंडचाच वेगवान गोलंदाज क्रिस जॉर्डनला संघात स्थान दिले आहे. जॉर्डनला मुंबईने दोन कोटी रुपयांत आपल्या संघात समाविष्ट केले आहे. जॉर्डन याआधी चेन्नई सुपर किंग्जकडून गेल्या मोसमात खेळला होता. त्याला यॉर्कर स्पेशालिस्ट मानले जाते आणि डेथ ओव्हर्समध्ये जॉर्डनची गोलंदाजी उत्कृष्ट आहे. तो मुंबई संघातही सामील झाला आहे.

मुंबईने ट्विटरवर लिहिले की, क्रिस जॉर्डन उर्वरित हंगामासाठी मुंबई संघात सामील होईल. जोफ्रा आर्चरच्या जागी जॉर्डनने संघात स्थान मिळवले आहे. जॉर्डनने २०१६ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने २८ सामने खेळले असून २७ विकेट्स त्याच्या नावावर आहेत. याशिवाय त्याने इंग्लंडकडून ८७ टी-20 सामने खेळले असून त्याच्या नावावर ९६ विकेट आहेत. जॉर्डनही शेवटच्या टप्प्यात आक्रमक फलंदाजी करू शकतो.

आर्चरला त्याच्या नावानुसार या मोसमात काही खास कामगिरी करता आलेली नाही. फिटनेसच्या समस्येमुळे त्याला अनेक सामन्यांमध्ये बाहेरही बसावे लागले. त्याने मुंबईसाठी फक्त चार सामने खेळले आणि १०.३८ च्या इकॉनॉमी रेटने फक्त दोन विकेट घेतल्या. या मोसमात त्याची गोलंदाजीची सरासरी ८३.०० होती, जी तो लवकरात लवकर विसरण्याचा प्रयत्न करेल. मात्र, या मोसमापूर्वी आर्चरची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याच्या एकूण विक्रमाबद्दल बोलायचे तर आर्चरने ३९ आयपीएल सामन्यांमध्ये २३.९०च्या सरासरीने आणि ७.४७ च्या इकॉनॉमी रेटने ४८ विकेट घेतल्या आहेत. १५ धावांत तीन बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने