Kolhapur Water Crisis: सुजलाम सुफलाम कोल्हापुरात पाण्यासाठी २५ वर्षांचा वनवास

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याकडून होणारा पाणीपुरवठा अत्यल्प आहे. परिसरात पाणीपुरवठा कसा आहे हे पाहण्यासाठी रविवारी काही ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली. आर. के. नगर परिसरातील १५ कॉलन्यांतून नाराजी व्यक्त झाली.

सकाळ सकाळी घागरभर पाण्यासाठी कुटुंबातील महिला शेजाऱ्यांच्या दारात उभ्या होत्या. महिन्यातून अनेकदा असा प्रसंग येत असल्याने प्रथमेश कॉलनीतील संगीता औरनाळे, स्नेहा कांबळे, रोहिनी सोनवणे, सादिया नदाफ, नेहा परब, यांनी पाण्याचा वनवास भोगत असल्याचे सांगितले.

- प्रकाश पाटील२७ वर्षे पुरवठा सुरळीत; पण…

खरेतर सोसायटीचे संस्थापक अण्णासाहेब बळवंत मनोळे यांनी २१ मे १९६९ मध्ये तत्कालीन चेअरमन बसाप्पा भीमाप्पा संगोळी, दशरथ भरमाप्पा इंग्रोळे यांना सोबत घेऊन संस्थेचा पाया रचत आर. के. नगर सोसायटीची स्थापना केली. परिसराला पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठ्यास बालिंग्यात आपल्या मालकीची जागा दिली.

त्यानुसार १९७० पासून सुभाषनगर पंपींगमधून पाण्याचा उपसा करून गणेश टेकडीतील टाकीतून पाणीपुरवठा सुरू केला. २७ वर्षे पुरवठा नियमित आणि सुरळीत होता. मात्र १९९७ पासून परिसरात नागरी वस्ती वाढू लागल्याने पाण्याची कमतरता भासू लागली. ते आजअखेर यात भर पडल्याने बारा वर्षांचा वनवास २५ वर्षांचा झाला तरी थांबलेला नाही.

‘एक दिवस आड’चा दावा फोल

पंचगंगेतून सलग २४ तास पाणी उपसा करून ते फिल्टर हाऊसमधून पाण्याच्या टाक्यांमध्ये येते. नंतर शहर व उपनगरातील विविध प्रभागांना पुरवले जाते.

मात्र, शहरात काही ठिकाणी चोवीस तास तर उपनगरात आठ दिवस पाण्याचा थेंबही मिळत नाही, अशी स्थिती आहे. अनेकदा मोर्चे, आंदोलने, रास्ता रोको करूनही उपयोग झाला नाही. उपनगरांना एक दिवस आड पाणी देणार असा दावा प्रशासनाने केला असला तरी प्रत्यक्षात तो फोल ठरला आहे.

उपसा केलेले पाणी मुरते कुठे?

आजही महिन्यातील अनेक दिवस मध्यरात्रीपर्यंत पाण्याची वाट बघावी लागते. याला वितरणातील त्रुटी आणि अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हेच कारण आहे. बालिंगा, शिंगणापूर, नागदेववाडीतील पाणी उपसा केंद्रातून २४ तास उपसा होतो, असे पाणीपुरवठा विभागातील यांत्रिक विभागाचे इंजिनिअर सांगतात. मग उपसा केलेले पाणी मुरते तरी कुठे, याचा तपास लागणे गरजेचा आहे.

कूपनलिकेचा आधार

रुमाले माळ, आर. के. नगर पाणंद, दिंडेनगर परिसरात चावीच्या पाण्याची कमतरता आहे. परिसरात चार हजार लोकसंख्या आहे. यातील अनेक कुटुंबांना कूपनलिकेचा आधार घ्यावा लागतो.

शेवटी शेजारीच ..

आर. के. नगर, प्रथमेश कॉलनी, गुलमोहर कॉलनी, रेणुकानगर, म्हाडा कॉलनी, केएमटी कॉलनी, रुमाले माळ, शिवस्वरूप नगर, हरी पार्क येथे संतप्त महिलांनी पाण्यासाठी शेवटी शेजारीच उपयोग पडतात, हेही सांगितले.

अनेक कारणांनी पुरवठा दुर्लक्षित

मोकाट कुत्री अंगावर येतात म्हणून पाणी सोडायला येत नाही, असेही सांगितले जाते. लाईट गेली, टाक्या भरल्या नाहीत, पंपिंग स्टेशन बंद अशी कारणे अपुऱ्या पाणीटंचाईची आहेत. मुख्य कारण म्हणजे पाणी सोडताना केलेला हलगर्जीपणा.

मात्र, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्यास नगरसेवक विरोध करतात, असाही अनुभव आहे. वितरण नलिकेत बॉल, काठ्या अन् दगड आहेत.ज्या भागात कमी दाबाने पाणी मिळते अशा ठिकाणी तपासणी केल्यावर पाईप लाईनमध्ये बॉल, काठ्या, लाकडाचे तुकडे, फळ्या, चप्पल आढळतात.

ज्या कॉलन्यांत पाईपलाईनला १६ इंच जोडणी आहे, तिथे भरपूर पाणी मिळते. मात्र अन्य भाग उपाशी राहतात. अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने उपनगरात पाणी सोडण्यासाठी कर्मचारी फिरकतच नाहीत, असा अनुभव आहे. अनेक ठिकाणी आठ दिवस पाणी येत नाही. ज्यावेळी पाणी येते त्यावेळी मध्यरात्र असते. त्यामुळे टँकर विकत घेण्याची काही कॉलन्यांवर वेळ आली आहे.

- रियाज डांगे, नागरिक, आर. के. नगर

प्रथमेश कॉलनीमध्ये गेली २० वर्षे राहत आहे. परिसरात पाण्यासाठी वणवण होते. स्थानिक नेते, लोकप्रतिनिधींना वारंवार विनंती करूनही दुर्लक्ष होत आहे.

- अनिता सोनवणे, महिला

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने