सर्वसामान्यांचा रोजचा चहा कडू; दुधाच्या भावाने गाठली शंभरी!

नाशिक : ग्रामीण भागासह शहरी भागातील घटते पशुधन, तीव्र झालेल्या उन्हाच्या झळा, चारा टंचाई व त्यातच आलेली लग्नसराई यामुळे दूध बाजारात मंगळवारी (ता.१६) दुधाच्या भावाने उच्चांक गाठला.
म्हशीचे दूध शंभर रुपये, तर गाईचे दूध पन्नास रुपयांवर पोचल्याने सामान्यांचा रोजचा चहाही कडू झाला आहे.
शहरात विविध डेअरीमधून पॅकबंद पिशव्यातून दुधाचा पुरवठा होतो. याशिवाय शहर व परिसरातील दुग्ध व्यावसायिकांच्या तबेल्यांमधूनही दुधाचा पुरवठा होतो. गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने दुधाचे उत्पादन घटले आहे.
त्यातच लग्नाची दाट तिथी असल्याने मागणीत वाढ झाली आहे. शहर व परिसरात पूर्वी मोठ्या प्रमाणावर तबेले होते. परंतु, मनपाच्या धोरणामुळे यातील अनेक तबेले हद्दीबाहेर गेले आहेत, याचाही परिणाम दुधाच्या आवकेवर होत आहे.



जनावरांचे खाद्य महागले
दुभत्या जनावरांसाठी उसाची, मक्याची कुट्टी, वाळलेले गवत, सरकी ढेप, तुरीची चुणी, गव्हाचा भुसा आदी खाद्य दिले जाते. एका म्हशीच्या खाद्यांवर दिवसाकाठी कमीत- कमी दीडशे ते दोनशे रुपये खर्च होतो.
चाऱ्याच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. सध्या शहर परिसरात अंदाजे वीस ते पंचवीस हजार म्हशी, तर दहा हजारांच्या आसपास गायी आहेत.
वैशिष्ट्यपूर्ण दूध बाजार
अब्दुल हमीद चौकात सकाळी व सायंकाळी दूध बाजार भरतो. अनेक तबेलेवाले या ठिकाणी दूध विक्रीस येतात. याशिवाय काहीजण केवळ कमिशनवरही दूध विक्री करतात. मागणी व पुरवठ्याच्या निकषानुसार येथील दुधाचे भाव ठरतात.
दुधाची आवक घटल्याने गेल्या काही दिवसांपासून येथील दुधाचे भाव ८० रुपये लिटरच्या आसपास स्थिर होते. परंतु मंगळवारी लग्नाच्या दाट तिथीमुळे दुधाचा भाव चक्क शंभर रुपयांपर्यंत पोचला.
कोजागरी पौर्णिमेला दुधाची मागणी वाढते, त्यामुळे दुधाचे भाव वाढतात. परंतु सामान्य स्थितीत दुधाच्या भावाने प्रथमच शंभरी गाठल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
"जनावरांच्या खाद्याच्या दरात दहा ते वीस टक्के वाढ झाली आहे. त्यातच लग्नसराईमुळे दुधाच्या मागणीत वाढ झाली आहे. पुरेसे उत्पादन नसल्याने भावात वाढ झाली आहे."
- अनिलअप्पा कोठुळे, दुग्धउत्पादक
"दुधाच्या मागणीत वाढ व तर आवकेत मोठी घट झाली आहे. त्यातच पशुखाद्य महागल्याने दुधाच्या दरांत वाढ झाली आहे. नजीकच्या काळातही ती कमी होण्याची शक्यता नाही."
- नाजीम हलीम पहिलवान, दुग्ध व्यावसायिक

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने