काय सांगता! चुलत बहिणीच्या साखरपुड्यासाठी दिल्ली गाठणार प्रियांका,मालतीसाठी सोडू शकते काम!

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिचं सिने करीअर आणि मुलगी मालती मेरी हिचं संगोपन अशी दुहेरी जबाबदारी लिलया सांभाळत आहे. परंतु प्रियांकानं अलिकडेच एका कार्यक्रमात सांगितलं की, जर गरज लागली तर मुलीसाठी ती करीअर देखील सोडायला तयार आहे. असं करण्याआधी ती जराही विचार करणार नाही. हे सांगताना प्रियांकानं तिच्या पालकांचं उदाहरण दिलं. या दोघांनीही प्रियांकाच्या करीअरसाठी त्यांचं डॉक्टरकीचं करीअर सोडलं होतं.दरम्यान, प्रियांका तिची चुलत बहिण परिणिती हिच्या साखरपुड्याला आणि लग्नसोहळ्यात सहभागी होण्याची चर्चा आहे.

प्रियांकानं १७ व्या वर्षी मिस इंडिया २००० हा किताब मिळवला होता. हा पुरस्कार मिळवल्यानंतर तिच्या आईवडिलांनी बरेली इथं त्यांची सुरू असलेली डॉक्टरकीची प्रॅक्टिस सोडली. खरं तर ते दोघंही खूप उत्तम डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. ते दोघंही जण त्यांच्या लेकीचं करीअर घडवण्यासाठी मुंबईत आले. प्रियांकाचे वडील अशोक चोप्रा आणि आई मधु चोप्रा भारतीय सैन्यात डॉक्टर होते. त्यानंतर त्यांनी युपीमध्ये खासगी रुग्णालय सुरू केलं होतं. परंतु मुलीसाठी त्यांनी हे सर्व सोडून दिलं. प्रियांकानं सांगितलं की, जेव्हा आई झाली नव्हती तेव्हा तिच्या पालकांनी तिच्यासाठी जे केलं ते तिला फार महत्त्वाचं वाटत नव्हतं.


मुलीसाठी प्रियांका करीअर सोडायला तयार

प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी जेव्हा त्यांच्या लेकीसाठी चांगलं चालणार करीअर सोडलं तेव्हा त्या ४० वर्षांच्या होत्या. प्रियांका आता ४० वर्षांची आहे. फेमिनाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये प्रियांकाला विचारण्यात आलं की, ती मुलीसाठी करीअर सोडून दुसऱ्या देशात जाऊन राहू शकते का. त्यावर प्रियांकानं सांगितलं की जर असं करण्याची वेळ आली तर मी जराही विचार न करता तोच निर्णय घेईन.

प्रियांकानं पुढं सांगितलं की,'माझ्यासाठी माझे आई-वडिल सतत वेगवेगळ्या ठिकाणी यायचे. तेव्हा मला त्याचं फार महत्त्व वाटायचं नाही. मी विचार करायचे ते तर त्याचं कर्तव्यच आहे. माझ्यासाठी माझं करीअर महत्त्वाचं होतं. मी त्यांचा कधीच विचार केला नाह. जेव्हा मी पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा मी या सगळ्याचा विचार केला. वयाच्या चाळीशीत आले आहे. आता जर मला माझ्या लेकीच्या भवितव्यासाठी माझं करीअर सोडून दुसऱ्या देशात राहून जायची वेळ आली तर मी एकही प्रश्न न विचारता त्यासाठी तयार होईन.'

प्रियांकानं पुढं सांगितलं की, 'तिच्या करीअरसाठी तिच्या पालकांनी अनेक गोष्टींचा त्याग केला आहे. त्यांनी मला अतिशय आदर्श पद्धतीनं वाढवलं आहे. त्यांच्या सारखे पालक मिळाल्यानं मी स्वतःला भाग्यवान समजते.' प्रियांकानं २०१८ मध्ये निक जोनास याच्याशी लग्न केलं. आता ती नवरा आणि लेकीबरोबर लॉस एंजेलिसला रहाते. प्रियांका आणि निक यांना सरोगसी तंत्रज्ञानाद्वारे २०२२ मुलगी झाली. त्यांन मुलीचं नाव मालती मेरी असं ठेवलं. अलिकडेच प्रियांका निक आणि मालती मेरीबरोबर भारतात आली होती.

परिणितीच्या लग्नात सहभागी होणार प्रियांका आणि निक

दरम्यान,प्रियांकाची चुलत बहिण अभिनेत्री परिणिती चोप्रा हिच्या साखरपुडा आणि लग्नसोहळ्यात प्रियांका आणि निक सहभागी होण्याची चर्चा आहे. परिणिती आप पक्षाचे नेता राघव चड्ढा यांच्याशी लग्न करणार आहे. या दोघांचा साखरपुडा १३ मे रोजी दिल्लीतील कनॉट प्लेस इथल्या कपूरथला हाऊसमध्ये होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने