नवी दिल्ली : भारतीयांना पुन्हा एकदा नोटबंदीचा सामना करावा लागत आहे. २०१६ मध्ये ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्यावर आता १९ मे, २०२३ रोजी २००० रुपयांची नव्याने आलेली नोटही बंद करण्याचा निर्णय सरकारने दिला. दरम्यान रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत वेबसाइटवर २००० रुपयांची नोट चलनातून बंद होत असल्याची बातमी समोर येताच प्रचंड ट्रॅफिक झालं. ज्यामुळे वेबसाइटच डाऊन झाली.
२००० च्या नोटा चलनातून बंद होणार असल्याची माहिती येताच वेबसाईट डाउन झाली होती. कारण यानंतर २००० रुपयांची नोट चलनात येणार नाही, हे वृत्त समोर येताच आरबीआयच्या वेबसाईटवर प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळेच संपूर्ण वेबसाईट ठप्प झाली. दरम्यान २०१६ प्रमाणे पुन्हा एकदा नोटबंदी झाल्याने अनेकजण घाबरले आहेत, पण घाबरण्याची गरज नाही. कारण केंद्र सरकारने २००० च्या नोटा एक्सचेंज करण्याची संपूर्ण व्यवस्था केली आहे. ज्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…
३० सप्टेंबरपर्यंत करु शकता एक्सचेंज
तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही कारण तुमच्याकडे नोट बदलण्यासाठी भरपूर वेळ आहे. तुम्ही तुमची २००० रुपयांची नोट बँकेतून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत आरामात बदलू शकता. यासोबतच तुम्ही तुमची २००० ची नोट बँकेत जमा देखील करू शकता. जर तुम्ही नोटा बदलण्यासाठी बँकेत जाणार असाल तर RBI ने सांगितले आहे की तुम्ही एकावेळी फक्त २०००० रुपयांइतक्याच २००० च्या नोटा बदलू शकता. याशिवाय रिझर्व्ह बँकेने बँकांना ग्राहकांना २००० रुपयांच्या नव्या नोटा तात्काळ देणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
२०१६ मध्ये देखील झाली होती नोटबंदी
याआधी देखील अशाप्रकारे नोटबंदी केली गेली होती. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी अचानकपणे सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. त्याचदरम्यान भारतात नव्या ५०० च्या नोटांसह १००० च्या जागी थेट २००० च्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. सरकारने २०० रुपयांची नवीन नोटही जारी केली होती, दरम्यान १००० ची नोट अद्याप जारी झाली नाही.