RTE प्रतीक्षा यादीतील प्रवेशासाठी १२ जूनपर्यंत संधी

छत्रपती संभाजीनगर : आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. जिल्ह्यात ४ हजार ३५ जागांसाठी सोडत निघाली होती. निवड झालेल्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २२ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, त्याकडे ४० टक्के पालकांनी पाठ फिरविली. त्यामुळे शिक्षण विभागाने ३० मे ते १२ जूनदरम्यान प्रतीक्षा यादीतील मुलांना प्रवेशाची संधी दिली आहे.
आरटीईसाठी जिल्ह्यात ५४५ शाळांमधून ४ हजार ६५ जागा आहेत. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय सोडतीमध्ये चार हजार ३५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तीन वेळा मुदतवाढ देऊनही केवळ २ हजार ६२६ विद्यार्थ्यांचेच प्रवेश निश्चित झाले. तर तब्बल १४०९ जागा रिक्त राहिल्या होत्या. मनासारखी शाळा न मिळणे, घरापासून शाळा दूर असणे आदी कारणांमुळे काही पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरविली.त्यामुळे आता या उर्वरित जागांसाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना १२ जूनपर्यंत संधी देण्यात आली आहे. शिक्षण विभागाने प्रतिक्षा यादीतील जागेनुसार २९ मेरोजी पालकांना एसएमएस पाठवले आहेत. पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहाता आरटीई पोर्टलवर प्रवेशाबाबत खात्री करुन घ्यावी. प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या पालकांनी अलॉटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केंद्रावरुन पडताळणी करुन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे.
प्रवेश प्रक्रिया संपवण्याचे आव्हान
जिल्ह्यात नवीन शैक्षणिक वर्षाला १५ जूनपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे आरटीईअंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया १५ जूनपर्यंत पूर्ण झाल्यास विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून शाळेत जाता येईल. परंतु, वेळेत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही अथवा लांबली तर शाळा सुरु झाल्यानंतरही प्रवेशाची प्रक्रिया सुरु राहील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होणार आहे. म्हणून शिक्षण विभागासमोर सदर प्रवेश प्रक्रिया संपविण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने