मेंदू ‘स्वच्छ’ करणारी झोप

न्यूयॉर्क : न्यूयॉर्क येथील रोचेस्टर वैद्यकीय केंद्र विद्यापीठातील डॉ. माइकेन नेदरगार्ड यांनी २०१३च्या उत्तरार्धात उंदरांच्या मेंदूवर प्रयोग करताना, योगायोगाने क्रांतिकारी शोध लावला. मेंदूला स्वतःची ‘सफाई’ यंत्रणा असते आणि ती रात्रीच्या गाढ झोपेत कार्यशील असते! खरे तर जवळपास एकाच वेळी तीन शोध लागले होते. ही यंत्रणा असणे, ती रात्रीच्या गाढ झोपेत कार्यरत असणे, या वेळी ‘अल्झायमर’ विकाराला कारणीभूत असणारे ‘बिटा अमायलॉइड’ हे द्रव्य मेंदूच्या, पर्यायाने शरीराच्या बाहेर जाणे. या तिन्ही बाबी संबंधित आहेत आणि यांच्या मुळाशी आहे आपली झोप, गाढ झोप.



या प्रयोगातील उंदरांच्या मेंदूतील विशिष्ट पेशी (ग्लायल) ‘कचरा सफाई’ करतात. जागृतावस्थेत आकुंचित असलेल्या पेशींतर्गत जागा (पोकळ्या) झोपेत मोठ्या प्रमाणावर (६० टक्क्यांपेक्षा जास्त) मोकळ्या होतात, हे आढळले. या पेशी दिवसभरात शरीरात साचलेली विषारे/अनावश्यक द्रव्ये झोपेत गोळा करून, रक्तावाटे मेंदूबाहेर व पर्यायाने शरीराबाहेर टाकतात. मेंदू व शरीर स्वच्छ, शुद्ध करतात! म्हणजेच, झोप ही प्रक्रिया नसेल किंवा अपुरी असेल, तर मेंदू अनेकविध विषारांनी भरला जाईल, त्याचे स्वास्थ्य बिघडेल. झोपेअभावी कमी वयातही विस्मृती, स्मृतिभ्रंश, कंपवात इत्यादी विकार जडतात, त्याचे मूळ कारण या ‘मेंदूवितंचन’ प्रक्रियेशी संबंधित आहे, हे या प्रयोगामुळे कळले. मोकळी जागा पुरेशी असेल, तरच या वितंचक पेशी ‘कचऱ्याचे’ उत्सर्जन करतात, हेही सिद्ध झाले.

शरीरातील वितंचन व्यवस्था (लिम्फाटिक सिस्टिम) ज्ञात होती. मेंदूच्या या व्यवस्थेबद्दल जेमतेम दशकापूर्वी शोध लागला. संशोधनाचा आत्मा असणारी आपली झोप मात्र अजूनही दुर्लक्षित आहे. वृद्धावस्थेत वा त्याआधीही, मेंदूसंबंधी विकार टाळण्यासाठीतरी आपल्याला पुरेल एवढी झोप घ्यायलाच हवी, नाही का?

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने