पुणे : सीबीएसई, आयसीएसई आणि आयएससीच्या निकालानंतर आता राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना, पालकांना वेध लागले आहेत ते महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी-बारावीच्या निकालाचे.
होय!! परंतु विद्यार्थी-पालकांची ही प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळातर्फे बारावीचा निकाल मे महिन्याच्या अखेरीस, तर दहावीचा निकाल जून महिन्याच्या सुरवातीला जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तयारी आता सुरू आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ‘दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार’ अशी विचारणा राज्य मंडळ, विभागीय मंडळाकडे सातत्याने होत आहे. दरम्यान, ‘‘दहावी-बारावीच्या निकालाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
मे महिन्याच्या अखेरीस बारावीचा निकाल, तर जूनच्या सुरवातीस दहावीचा निकाल लागेल,’’ असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. तसेच निकालाबाबत लवकरच अधिकृतपणे माहिती देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.