द फॅमिली मॅन ३ साठी व्हा सज्ज! मनोज बाजपेयींनी दिले महत्त्वाचे संकेत

 मुंबई: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते मनोज बाजपेयी त्यांच्या 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजमुळे नेहमीच चर्चेत असतात. ही त्यांची सर्वात गाजलेली वेब सिरीज आहे. या सिरीजचे आधीचे दोन भाग प्रेक्षकांना फार आवडले. त्यातील मनोज यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. आता चाहत्यांना मनोज यांच्या द फॅमिली मॅन या वेबसिरीजच्या तिसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे. अभिनेत्याने या सिरीज संबंधित एक मोठी माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

दरम्यान बाजपेयींच्या 'द फॅमिली मॅन' या सीरिजचे दोन्ही सीझन चांगलेच गाजले. अलीकडेच, मनोज यांनी एका मुलाखतीत आपल्या आगामी वेब सिरीज 'द फॅमिली मॅन ३' बद्दल सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, 'आज सकाळी एक चिमणी उडत येऊन माझ्या खिडकीवर बसली आणि आम्ही म्हटले, कदाचित या वर्षाच्या शेवटी आपण शूटिंग करू शकतो. पैसे वाचवल्यावर जर सर्व काही ठीक झाले तर कदाचित करुच.'
मनोजच्या या वक्तव्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. या वक्तव्यात मनोज यांनी चाहत्यांच्या उत्सुकतेने भरलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. आपला आवडता अभिनेत्या त्याच्या सिरीजचा पुढचा भाग घेऊन कधी येणार याची चाहत्यांना प्रतिक्षा होती. त्यामुळे याबद्दल पुसटशी कल्पना देऊन मनोज यांनी चाहत्यांना गोड गिफ्टच दिले आहे.

'फॅमिली मॅन सीझन २' चा प्रीमियर २०२२ मध्ये आयोजित करण्यात आला होता, त्याला चाहत्यांची चांगली पसंती मिळाली. या सिरीजमधील सामंथाच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. तेव्हापासून चाहते या वेब सिरीजच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. ही वेब सिरीज एक चांगले वडील अन् नवरा आणि उत्तम TASC ऑफिसर अशा दुहेरी आयुष्यातील संघर्षावर आधारित आहे.

द फॅमिली मॅन'च्या पहिल्या सीझनमध्ये मनोज यांनी दहशतवाद्यांशी लढा दिला होता. तर दुसऱ्या सीझनमध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथाचे अॅक्शन सीन्स चाहत्यांना पाहायला मिळाले. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ सिरीजच्या दुसऱ्या भागाच्या शेवटी, यावेळी श्रीकांत कोरोनासारख्या महामारीचा सामना करताना पाहायला मिळेल असे संकेत देण्यात आले होते. त्यामुळे येणाऱ्या तिसऱ्या भागात काय पाहायला मिळेल, कोणती कथा असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने