भारत : घराच्या दारात तुळस लावणे हा शो पिस नाही तर घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा टिकावी यासाठी तुळस लावण्यात येते. पूर्वपरंपरागत तुळशीचा आयुर्वेदातही आरोग्यासाठी गुणकारी असा उपयोग सांगण्यात आला आहे.
तुळस वापरल्याने आरोग्यासाठी नक्की काय फायदा होतो? तुळस कशा पद्धतीने वापरावी आणि तुळस वापरणे योग्य की अयोग्य हे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत. तुळस ही हिंदू धर्मानुसार पूजनीय मानली जाते. ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरात आजारपण कमी येतं अशीही मान्यता आहे. आयुर्वेदिक डॉ. माधव भागवत यांनी तुळशीमुळे नक्की शरीराला आणि आरोग्याला कसे फायदे होतात हे सांगितले.
श्वासाची दुर्गंधी थांबविण्यासाठी उपयोगी
अनेकांना श्वासाच्या दुर्गंधीची समस्या असते. अशा व्यक्तींनी तुळशीची पाने खावीत. तुळशीच्या पानाचा सुगंध हा तीव्र असतो आणि त्यामुळे श्वासाची दुर्गंधी मारण्यास मदत मिळते. रोज तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी १ वा २ तुळशीची पाने चावली अथवा चघळली तर याचा तुम्हाला फायदा मिळतो आणि कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
वजन कमी करण्यास उपयुक्त
तणावाखाली असणाऱ्या व्यक्तींना बरेचदा भूक लागते आणि मग नकळत खूप खाण्याने वजन वाढतं. मात्र अशावेळी तुम्ही तुळशीची पाने खाल्ल्यास, तणावासाठी त्रासदायक ठरणाऱ्या हार्मोनची कोर्टिसोलची पातळी कमी होते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते.
रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत
तुम्ही घरातील तुळशीची ताजी पाने नियमित खाल्ली तर रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते. तुळशीची पाने हे फुफ्फुसाचा संसर्ग आणि ब्राँकायटिससारख्या आजारापासून तुम्हाला दूर ठेवतात. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून फुफ्फुसांची कार्यक्षमता सुधारणा होण्यास मदत मिळते.
सर्दी-खोकला-कफासाठी प्रभावी
सर्दी, खोकला, ताप अथवा कफ झाल्यास, तुळस गुणकारी ठरते. कफासाठी काढा बनवतानाही तुळशीचा वापर करण्यात येतो. आजीच्या बटव्यातील उपयांमध्येही तुम्हाला हा उपाय सापडेल. कफावर तुम्ही पाण्यात तुळशीची पाने, काळी मिरी, आले, लवंग, धणे, जिरे, गूळ घालून उकळून केलेला काढा हा प्रभावी ठरतो.
अनियमित मासिक पाळीवर उपयोगी
अनेक महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमितता असते. कधी कधी मेनोपॉजचा त्रासही असतो. अशावेळी तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने समस्येपासून आराम मिळू शकतो. तुळशीचे नियमित सेवन करावे.
स्मरणशक्ती सुधारण्यासाठी
अनेकांना आजकाल नैराश्याचा त्रास सुरू झाला आहे. मात्र नैराश्याविरोधी मन शांत राहण्यासाठी तुळशीच्या पानांचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे लहानपणापासूनच रोज २-३ तुळशीची पाने खाण्याची सवय मुलांना लावावी. यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत मिळते.
जखम बरी होण्यासाठी
जखम जरी बरी होत नसेल तर तुळशीच्या पानांचा वापर करावा. तुळशीची पाने तुम्ही तुरटीमध्ये मिक्स करून घ्या आणि जखमेवर लावा. तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल घटक अधिक आढळतात, जे जखम बरी करण्यासाठी उपयोगी ठरतात.
पोट खराब असल्यास
तुम्हाला Loose Motion चा त्रास होत असल्यास तुळस गुणकारी ठरते. जिरे आणि तुळशीची पाने एकत्र वाटून घ्या. हे चाटण तुम्ही दिवसातून ४ वेळा थोडे थोडे चाटा आणि वरून लगेच गरम पाणी प्या. यामुळे पोट लवकर बरे होण्यास मदत मिळते.
तणाव कमी होतो
तणावादरम्यान कॉर्टिसोलची पातळी संतुलित राहणे गरजेचे आहे. मात्र तणाव कमी करण्यासाठी तुळशीची पाने उपयोगी ठरतात. तुळशीच्या पानाने शरीराची उर्जा व्यवस्थित राहण्यास मदत मिळते आणि तणावही कमी होतो.
डोकेदुखीतून सुटका
डोकेदुखी ही कॉमन समस्या आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. तुळस आणि आल्याचा चहा पिण्याने डोकेदुखी लवकर निघून जाते. तुळशीचा चहा पूर्वपरंपरागत चालत आलेला आहे. मेंदूला चांगली उर्जा मिळवून डोकेदुखीतून सुटका देण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो.