आलेच सर्वाधिक तेजतर्रार; कापूस सोयाबीनकडून अपेक्षाभंग, आल्यामुळे शेतकऱ्यांना अच्छे दिन; जाणून घ्या दर

औरंगाबाद : आल्यातील (अद्रक) तेजी कायम आहे; किंबहुना मागच्या आठवड्यापेक्षा आणखी जास्त भाव वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. याच आल्याला जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात ४,००० ते १२,००० रुपये क्विंटल असा ठोक विक्रीचा सर्वाधिक भाव असून, ५० ते ६० रुपये पावशेरने त्याची शहर परिसरात किरकोळ विक्री होत आहे. आल्याबरोबरच श्रावण घेवड्याचाही (बिन्नस) भाव वाढला असून, इतर बहुतांश भाज्यांचे दर मात्र कडाक्याचा उन्हाळा असूनही स्थिर असल्याचा दिलासा मिळत आहे.

गेल्या एक ते दीड महिन्यापासून आल्याचे भाव सतत वाढत आहेत. त्यापूर्वी अवघ्या १० रुपये पावशेरने किरकोळ विक्री होत असलेले आले हळूहळू १५ रुपये, मग २० रुपये, ३० रुपये, ४० रुपये आणि आता तर ५० ते ६० रुपये पावशेरने विक्री होत आहे. पुन्हा उन्हाळ्यात आल्याची मागणी कमी होऊन भावही कमीच राहतो, असा अनुभव असताना, यंदा मात्र आल्याचे दर सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुन्हा आवक कमी होत असताना वाढणारे भाव आल्याची मागणी सतत वाढत असल्याचे सुचित होत आहे.
जाधववाडीच्या बाजारात १० मे रोजी आल्याची १५ क्विंटल आल्याची आवक झाली होती आणि ३००० ते ११००० रुपये क्विंटल असे ठोकचे भाव होते. तर, केवळ सहा दिवसांनी म्हणजेच मंगळवारी (१६ मे) आल्याची १३ क्विंटल आवक झाली आणि ४००० ते १२००० रुपये क्विंटल असे मंगळवारी ठोकचे भाव होते. याच आल्याची किरकोळ विक्री ६० ते ७० रुपये पावशेरने मंगळवारी शहरात झाली. त्यामुळे शहरात ५० ते ६० रुपयांपेक्षा कुठेही भाव कमी नव्हता, हेही स्पष्ट झाले.


सततच्या भाववाढीमागे घटत जाणारी आवक आणि मागणी कायम, हे सूत्र आहेच; परंतु वाढणाऱ्या मागणीसाठी रसवंत्यांकडून होणारा मोठा वापर हे कारणही प्रकर्षाने समोर येत आहे. आल्याप्रमाणेच श्रावणघेवड्याची ३५ ते ४० रुपये पावशेरने विक्री होत असून, हाच श्रावणघेवडा या वर्षात कधीही २० रुपये पावशेरपेक्षा जास्त भावाने विक्री झालेला नाही. अर्थात, फुलकोबी, पत्ताकोबी, भेंडी, दोडके, सिमला मिरची आदी फळभाज्यांची अजूनही सुमारे २० रुपये पावशेरने किरकोळ विक्री होत आहे. बहुतांश पालेभाज्यांची आता सरळसरळ १५ रुपये जुडीने किरकोळ विक्री होत आहे. अर्थात, तीव्र उन्हाळा असूनही बहुतांश पालेभाज्या व फळभाज्यांचे दर बऱ्यापैकी स्थिर असल्याचा दिलासा कायम आहे.


आंबा अजूनही शंभरीतच


फळांचा राजा आंब्यांचे भाव काही आठवड्यांपासून बऱ्यापैकी स्थिर असून, बहुतांश प्रमाणात दिसणारा केशर, दशेरी, बदाम आदी आंब्यांची सुमारे १०० ते १२० रुपये किलोने विक्री होत आहे. जाधववाडीच्या बाजारात आंब्यांची आवक कमी होत असून, मंगळवारी २७१ क्विंटल इतकी आवक झाली आणि त्यांची २२०० ते ९५०० रुपये क्विंटलने ठोक विक्री झाल्याची नोंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात झाली. अर्थात, जाधववाडीशिवाय थेट विक्रेत्यांकडे विविध भागातून अनेक प्रकारचे आंबे विक्रीसाठी दररोज दाखल होत असल्याचेही समजते. आंब्याप्रमाणेच अंजीरची ८० रुपये किलो, बाहेर देशातील सफरचंदांची २१० ते २२० रुपये किलो, पपई ५० रुपये किलो अशी फळांची किरकोळ विक्री होत आहे.


मधुर फणसांची भुरळ


सध्या शहर परिसरात फणसांची गरे ठिकठिकाणी विकली जात आहे. खास कर्नाटकातून येत असलेल्या भल्यामोठ्या फणसांमधील गऱ्यांची ५० रुपये पावशेरने किरकोळ विक्री होत आहे. अत्यंत मधुर अशी गरे नागरिकांना भुरळ पाडत असून, हातगाडीसमोरुन येणारे-जाणारे हमखास ही गरे विकत घेत असल्याचे दिसून येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने