‘आदिपुरुष’च्या स्क्रीनिंगदरम्यान सगळ्या चित्रपटगृहांतील एक सीट असणार राखीव; नेमकी कोणासाठी ते जाणून घ्या!

साउथचा सुपस्टार प्रभास आणि क्रिती सेनॉन यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘आदिपुरुष’ सध्या चांगलाच चर्चेत आहे. जसजशी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे तसतशा या चित्रपटाबद्दलच्या नवनवीन गोष्टी उलगडत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांच्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रत्येक चित्रपटगृहात एक जागा रिक्त ठेवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. “हे आसन भगवान हनुमानांना समर्पित असेल. हनुमानाप्रति लोकांची श्रद्धा जागृत करण्याच्या उद्देशाने निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. जेव्हा जेव्हा रामायणाचे पठण केले जाते तेव्हा तेथे हनुमान प्रकट होतात. हा आमचा विश्वास आहे. या श्रद्धेचा मान राखून, ‘आदिपुरुष’च्या प्रत्येक स्क्रीनिंगदरम्यान एक जागा राखीव ठेवली जाईल,” अशी भूमिका निर्मात्यांनी घेतली आहे.
‘आदिपुरुष’ चित्रपट तेलुगू, तमिळ, हिंदी, मल्याळम् आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ओम राऊत यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. यामध्ये प्रभास रामच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रिती सेनाॅन सीतेची भूमिका साकारणार आहे. तर सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली आहे. हनुमानाची भूमिका मराठी अभिनेता देवदत्त नागे साकारत असून लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग पाहायला मिळणार आहे.

५०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाने तब्बल ४३२ कोटींची कमाई प्रदर्शनाआधीच केली आहे. Tollywood.net च्या अहवालानुसार, या चित्रपटाचे ‘तेलुगू थिएट्रिकल राइट्स पीपल मीडिया फॅक्टरी’ने १८५ कोटींना विकले आहेत. तर जीएसटी धरून ही रक्कम २४७ कोटी होत आहे. याखेरीज सॅटेलाइट, म्युझिक आणि डिजिटल हक्क मिळून तब्बल ४०० कोटींची कमाई ‘आदिपुरुष’ने प्रदर्शनाआधीच केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने