‘कोल इंडिया’ला गुंतवणूकदारांची चांगली पसंती; सरकारच्या तिजोरीत ४००० कोटी रुपये येणार

सार्वजनिक क्षेत्रातील ‘महारत्न’ दर्जा असलेल्या कोल इंडियाच्या समभागाची भांडवली बाजारातील वाटचाल किमतीच्या बाबतीत इतकी उत्साहदायी राहिली नसली तरी गुंतवणूकदारांची या कंपनीला पसंती अजूनही कायम आहे, हे शुक्रवारी कंपनीच्या समभाग विक्रीने मिळविलेल्या प्रतिसादातून पुन्हा एकदा दाखवून दिले.

ऑफर फॉर सेलच्या (ओएफएस) माध्यमातून गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस पार पडलेल्या कोल इंडियाच्या समभाग विक्रीला किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी दणदणीत प्रतिसाद दिला. शुक्रवारी भागविक्रीच्या अंतिम दिवशी गुंतवणूकदारांकडून ४१७ टक्के अधिक भरणा करणारा प्रतिसाद मिळाल्याचे उपलब्ध आकडेवारीने स्पष्ट केले. या माध्यमातून कंपनीतील मालकीचा काही हिस्सा विकणाऱ्या केंद्र सरकारला ४,००० कोटी रुपयांहून अधिक निधी मिळण्याची अपेक्षा आहे.संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुरुवारी कोल इंडियाच्या २८.७६ कोटी समभागांसाठी बोली लावली होती, तर किरकोळ गुंतवणूकदारांनी शुक्रवारी २.५८ कोटी समभागांसाठी मागणी नोंदवली. तसेच शुक्रवारी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आणखी ५.१२ कोटी समभागांसाठी बोली लावली. दोन दिवस चाललेल्या भागविक्रीमध्ये सरकारने कोल इंडियामधील १८.४८ कोटी समभाग म्हणजेच सुमारे ३ टक्के भागभांडवली हिस्सा २२५ रुपये प्रति समभाग या किमतीला विकला. यातून सरकारी तिजोरीत ४,००० कोटी रुपये जमा होण्याची आशा आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये केंद्र सरकारकडून कोल इंडियाच्या ओएफएसच्या माध्यमातून केली गेलेली ही पहिली हिस्सा विक्री आहे. सरकारची सध्या कोल इंडियामध्ये ६६.१३ टक्के हिस्सेदारी आहे. चालू आर्थिक वर्षासाठी निर्धारित केलेल्या ५१,००० कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यास या भागविक्रीमुळे सरकारला मदत मिळणार आहे. शुक्रवारी दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात कोल इंडियाचा समभाग किरकोळ वधारून २३०.९० रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या समभागाच्या बाजारभावानुसार कंपनीचे १,४२,२९७ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने