मुंबईत वाया गेलेले अन्न आणि भाजीपाल्यापासून होणार बायोगॅस निर्मिती

 मुंबई : मुंबईतील कचऱ्याची समस्या मार्गी लागावी, महानगरातील प्रदूषण कमी व्हावे यासाठी मुंबई महापालिका आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्यात गुरुवारी 'कॉम्प्रेस्ड बायोगॅस संयंत्र' स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे लवकरच मुंबईतील हजारो टन कचऱ्याची समस्या मार्गी लागणार आहे.

या सामंजस्य करारावेळी उपस्थित असलेले राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कचऱ्यापासून तयार होणारा बायोगॅस मुंबईला प्रदूषणापासून मुक्त ठेवणार असल्याचे सांगितले. मुंबईकरांना पर्यावरणपूरक बायोगॅसही वापरासाठी उपलब्ध होणार आहे.



मुंबई महानगरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल येथील वाया गेलेले अन्न आणि मोठ्या भाजी मंडयांतील वाया गेलेला भाजीपाला संकलित करण्यात येणार आहे. त्यानंतर या जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मिती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी दररोज लागणारा जैविक कचरा मुंबई महापालिकेकडून एका विशेष वाहनातून पुरविला जाणार आहे. कचऱ्याचे संकलन, पृथक्करण आणि वितरण अशी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बायोगॅस प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तीन टप्प्यांत या प्रकल्पाचे काम सुरू राहणार आहे. त्यात जैविक कचरा प्रक्रिया प्रकल्प, सेंद्रिय खत उत्पादन संयंत्र आणि हरित इंधन उत्पादन संयंत्र या टप्प्यांचा समावेश असेल. या प्रकल्पाद्वारे उत्पादित केलेला जैविक वायू मुंबईच्या हद्दीत वापरला जाणार आहे.

'पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी बायोगॅस हा योग्य पर्याय आहे. प्रत्येकाने ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करायला हवे. गृहनिर्माण संस्थांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. तसेच या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांनाही सामावून घ्या. जणेकरून शाळेतच मुलांमध्ये जनजागृती केली तर हा विषय घरोघरी पोहोचेल', असे पालकमंत्री केसरकर यांनी नमूद केले. मुंबईत तयार होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रियेसाठी आगामी कालावधीत आणखी भूखंड उपलब्ध करून देणार असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिका क्षेत्रात नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या गृहनिर्माण सहकारी संस्थांना मालमत्ता करामध्ये पाच टक्के ते दहा टक्के इतकी प्रोत्साहनपर सवलतही देत आहोत, असेही ते म्हणाले.

मुंबई महापालिकेकडून घनकचरा उपायुक्त चंदा जाधव आणि 'महानगर गॅस'कडून उपाध्यक्ष मानस दास यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी दररोज एक हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस तयार होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने