भारतातही आता रंगणार ‘मोटो जीपी’ शर्यत! मोटारबाइकची ही शर्यत कितपत यशस्वी ठरणार?

सर्वाधिक युवकांचा देश असलेल्या भारताचे आता क्रीडाजगताला आकर्षण वाटू लागले आहे. विविध खेळांच्या स्पर्धा भारतात आयोजित करण्याचा आता जगभरातील क्रीडा संघटनांचा प्रयत्न सुरू आहे. काही वर्षांपूर्वी फॉर्म्युला-१ ही वेगवान गाड्यांची स्पर्धा उत्तर प्रदेशातील बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटवर झाली होती. आता याच ठिकाणी मोटारबाइक्सची सर्वांत मोठी स्पर्धा असलेल्या ‘मोटो जीपी’मधील एक शर्यत रंगणार आहे. भारतात प्रथमच मोटो जीपीमधील शर्यतीचे आयोजन केले जाणार आहे. हा प्रयोग कितपत यशस्वी ठरणार आणि या स्पर्धेचा इतिहास काय, याचा आढावा.
मोटो जीपी म्हणजे काय?

ग्रांप्री मोटारसायकल रेसिंग अर्थात ‘मोटो जीपी’. ‘फेडरेशन इंटरनॅशनाले डे मोटोसायक्लिसिमे’च्या (एफआयएम) अंतर्गत वेगवान मोटारबाइक्सची ही स्पर्धा २०व्या शतकाच्या सुरुवातीपासून आयोजित केली जात आहे. ‘एफआयएम’तर्फे या स्पर्धेतील शर्यतींचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा प्रथम १९४९ मध्ये खेळवली गेली होती. युरोप आणि अमेरिकेत ही स्पर्धा सर्वाधिक प्रचलित आहे. होंडा, यामाहा आणि सुझुकी या जपानी कंपन्यांच्या बाइक्सनी या स्पर्धेत वर्चस्व गाजवले आहे. मात्र, आशियात या स्पर्धेला फॉर्म्युला-१ इतकी लोकप्रियता प्राप्त झालेली नाही.

यंदा भारतात शर्यतीचे आयोजन का?

एकूण २० शर्यतींपैकी एक शर्यत यंदा उत्तर प्रदेशातील बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटवर होणार आहे. ही शर्यत २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत रंगणार आहे. २४ सप्टेंबरला मुख्य शर्यत पार पडेल. जगभरातील आपली लोकप्रियता वाढवण्याच्या दृष्टीने यंदा मोटो जीपीने एक शर्यत भारतात घेण्याचे ठरवले आहे. ‘‘मोटो जीपीचा प्रसार अधिक देशांत व्हावा या हेतूने यंदा भारतात शर्यत घेण्याचा निर्णय झाला आहे. मोटरस्पोर्ट्सच्या इतिहासातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. त्यामुळे नवे प्रेक्षक, नवा चाहतावर्ग निर्माण होऊ शकेल,’’ असे मोटो जीपीकडून सांगण्यात आले. भारतात २०११ ते २०१३ या कालावधीत फॉर्म्युला-१च्या तीन शर्यती झाल्या होत्या आणि त्यांना चाहत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला होता. त्यामुळे आता मोटो जीपीलाही असाच प्रतिसाद अपेक्षित आहे.

भारतात होणाऱ्या शर्यतीच्या तिकिटांची किंमत किती?

बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटवर होणाऱ्या तिकिटांच्या विक्रीला सुरुवात झाली असून आयोजकांकडून पहिले तिकीट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देण्यात आले. या शर्यतीसाठी ८०० रुपयांपासून ते ४० हजार रुपयांपर्यंतची तिकिटे उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही शर्यत जेथून सुरू होणार आणि जेथे संपणार, त्या ‘मेन ग्रँडस्टँड’च्या तिकिटांची किंमत २० ते ३० हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

यंदाच्या हंगामात आतापर्यंत किती शर्यती झाल्या आहेत?

यंदाच्या मोटो जीपीच्या हंगामात आतापर्यंत आठ शर्यती झाल्या आहेत. सध्या या स्पर्धेचा युरोपातील टप्पा सुरू आहे. त्यानंतर आशियातील शर्यतींना सुरुवात होईल. भारतात होणारी शर्यत ही या हंगामातील १३वी शर्यत असेल. भारतानंतर जपान, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, थायलंड, मलेशिया आणि कतार या आशियातील अन्य केंद्रांवरही शर्यती होणार आहेत.

कोणते स्पर्धक ठरणार प्रमुख आकर्षण?

गतविजेता फ्रँचेस्को बाग्नाइआ (डुकाटी लेनोव्हो टीम), होर्गे मार्टिन (प्रिमा प्रमॅक रेसिंग), मार्को बेझ्झेची (मूनी व्हीआर४६ रेसिंग टीम) आणि योहान झार्को (प्रिमा प्रमॅक रेसिंग) या रायडर्समध्ये सध्या अव्वल स्थानांसाठी चढाओढ सुरू आहे. त्यामुळे यांच्यातील स्पर्धा हेच चाहत्यांसाठी प्रमुख आकर्षण असणार आहे. व्हॅलेंटिनो रॉसी हा मोटो जीपीमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट रायडर दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाला. अन्यथा त्याला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये सर्वाधिक उत्सुकता असती, हे निश्चित.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने