दहावीनंतर स्ट्रीम निवडताना टाळा या चुका; वाचा काय घ्यावी खबरदारी

दहावी हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. यानंतर निवडलेली वाटच पुढे आपलं करिअर घडवण्यात मोलाची ठरते. बऱ्याच वेळा पालक, नातेवाईक किंवा मित्रांचं ऐकून विद्यार्थी एखादी स्ट्रीम निवडतात. हा निर्णय कधी योग्य ठरतो, तर कधी चुकीचा. त्यामुळे केवळ ऐकीव माहितीवरुन स्ट्रीम निवडण्याऐवजी, योग्य पद्धतीने निर्णय घेणं गरजेचं आहे.

दहावीनंतर सायन्स, आर्ट्स, कॉमर्स किंवा अन्य कोणत्याही स्ट्रीमला तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला भविष्यात काय व्हायचं आहे, किंवा तुमच्यासाठी काय योग्य ठरेल यानुसार स्ट्रीम निवडणं कधीही फायद्याचं असतं. यासाठीच आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.
अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन

दहावीनंतर पुढं काय करायचं याबाबत सल्ला देणारे खूप जण आपल्या आजूबाजूला असतात. मात्र, फुकटचा सल्ला आणि मार्गदर्शन यातील फरक लक्षात घ्या. तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं आहे, त्यातील तज्ज्ञ व्यक्तींशी चर्चा करा. यामुळे तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील, आणि तुम्ही योग्य स्ट्रीमची निवड करू शकाल.

तुमचा रस कशात?

आपल्या आजूबाजूला आपण असे बरेच लोक पाहतो, जे आपल्या नोकरीत खुश नाहीत. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे, दहावीनंतर दुसऱ्यांच्या दबावामुळे घेतलेली नावडती स्ट्रीम. तुम्हाला कोणत्या गोष्टीत रस आहे हे लक्षात घेऊन योग्य स्ट्रीम निवडणं गरजेचं आहे. तुमच्या आवडत्या विषयातील करिअर कराल, तर नक्कीच तुम्ही पुढे आयुष्यभर आनंदी असाल.

स्वतःचं कौशल्य ओळखा

तुम्हाला काय आवडतं हे जितकं महत्त्वाचं आहे, तेवढंच महत्त्वाचं हेदेखील पाहणं आहे की तुम्हाला काय जमतं. तुम्हाला जे करिअर करायचं आहे, त्यासाठी लागणारी मेहनत करण्याची तुमची तयारी असायला हवी. चुकीच्या स्ट्रीमला प्रवेश घेऊन, नंतर पश्चाताप करण्यापेक्षा वेळीच योग्य निर्णय घेऊन चांगलं करिअर घडवणं कधीही उत्तम.

काऊन्सिलरची मदत घ्या

तुम्हाला जी गोष्ट आवडते त्यात तुमचं करिअर होईलच असंही नसतं. त्यामुळेच आवड, करिअर आणि तुमची क्षमता या सगळ्याचा योग्य ताळमेळ साधता आला पाहिजे. यासाठी तुम्हाला काउन्सिलर नक्कीच मदत करू शकतात. विविध अ‍ॅप्टिट्यूड टेस्टच्या माध्यमातून तुम्ही स्वतःसाठी योग्य असणारी स्ट्रीम निवडू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने