सवलतींमुळे लालपऱ्या हाऊसफुल! 3 महिन्यात 15 कोटी महिलांनी केला प्रवास

राज्य शासनाने एसटीतील प्रवासासाठी विविध सवलती जाहीर केल्या आहेत. ६५ ते ७५ वर्ष वयोगटातील नागरिकांना ५० टक्के तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेंतर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना मोफत प्रवास आहे.

महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सूट मिळत आहे. या योजनेतंर्गत तीन महिन्यात १५ कोटीहून अधिक महिलांनी बसने प्रवास केला असून साडेनऊ महिन्यात अकरा कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरीकांनी या योजनेचा लाभ घेतला.

या सवलतींमुळे राज्यात सर्वत्र लालपरी हाऊसफुल आहेत. शाळा - महाविद्यालये सुरु झाले असून खरीप हंगामाच्या तोंडावर जून महिन्यात देखील बसस्थानके गर्दीने फुलून गेली आहेत.
खासगी प्रवासी वाहतुकीच्या ओझ्याखाली लालपरी दबून गेली होती. दिवाळी, उन्हाळी सुट्या, सण-उत्सव व यात्रा-जत्रा वगळता इतर वेळेत एसटीला प्रवाशांची वाणवा जाणवत होती. अनेकवेळा बोटावर मोजण्याइतके प्रवासी घेऊन बसेस धावत.

खासगी वाहतुकीचे जाळे शहरांबरोबरच ग्रामीण भागातही खोलवर रुजले गेल्याने अनेक ठिकाणच्या फेऱ्या प्रवासी अभावी बंद कराव्या लागल्या. गेल्यावर्षी एसटीच्या संपामुळे खासगी वाहतुकीला सुगीचे दिवस आले. संपकाळात खासगी वाहतुकीकडे वळलेले प्रवासी पुन्हा लालपरीकडे वळविण्याचे मोठे आव्हान शासन व एसटी प्रशासनापुढे उभे होते.

शासनाने २६ ऑगस्ट २०२२ पासून अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अमलात आणली. ७५ वर्षावरील वृद्धांना मोफत प्रवास सुरु झाल्याने एसटीतील प्रवाशांची संख्या वाढली. २६ ऑगस्ट ते १५ जून या कालावधीत ११ कोटी ४३ लाख ४२ हजार ८०९ ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला.

या योजनेमुळे वृध्द नागरिकांची लग्न सोहळे व इतर कार्यक्रमांमधील संख्या वाढली. राज्यातील विविध धार्मिक स्थळांवर देखील ज्येष्ठांचा वावर वाढला. शासनाने १७ मार्च २०२३ ला महिला सन्मान योजना जाहीर केली.

या योजनेंतर्गत सर्व वयोगटातील महिलांना (७५ वर्षाखालील) तिकिटात ५० टक्के सवलत देण्यात आली. या योजनेला सर्वत्र उदंड प्रतिसाद मिळत आहे. सवलतीच्या योजनांचा सर्वाधिक फटका खासगी वाहनांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे.

"सामान्य, गरीब जनतेला न्याय मिळावा हेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धोरण आहे. या धोरणाचा एक भाग म्हणून एसटीत वृध्द नागरीकांना मोफत तर माता भगिनींना प्रवासात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. या योजनेला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वृद्धांबरोबरच महिलांचा प्रवास वाढल्याने कुटुंब व नातेवाईकांमधील संवाद वाढला आहे."

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने