अमरनाथ यात्रेकरू पुन्हा मार्गस्थ

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील खराब हवामानामुळे स्थगित केलेली अमरनाथ यात्रा रविवारी तीन दिवसांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली. पंजतरणी आणि शेषनाग तळशिबिरांमधून यात्रेकरूंच्या तुकडीला अमरनाथकडे रवाना होण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अधिकाऱ्यांनी सांगितले, की अमरनाथ गुहा परिसरातील आकाश निरभ्र झाल्यानंतर गुहेचे दरवाजे उघडले आणि वाटेत अडकलेल्या भाविकांना शिविलग दर्शनाची परवानगी देण्यात आली. पंजतरणी तळशिबिरातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेस दूरध्वनीवरून सांगितले, की दर्शन घेतलेल्या यात्रेकरूंना बालताल तळशिबिराकडे परतण्याची परवानगी देण्यात आली आहे.अनंतनाग जिल्ह्यात काझीगुंड येथे अडकलेल्या ७०० हून अधिक अमरनाथ यात्रेकरूंना लष्कराने आपल्या छावण्यांत आश्रय दिला आहे. काल प्रतिकूल हवामानामुळे आणि जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्याने यात्रेकरूंच्या कोणत्याही नव्या तुकडीला जम्मूहून पुढे जाण्याची परवानगी दिलेली नव्हती. दरड कोसळल्याने ठप्प महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहे.

रामबन जिल्ह्यात भूस्खलनामुळे रस्ता ४० मीटर खचला आहे. येथे तीन हजार ५०० हून अधिक वाहने अडकली आहेत. गुरुवारपासून जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या परिसरात सोमवारपासून हवामान सुधारण्याची शक्यता आहे. पावसामुळेच जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील दरडीचे ढिगारे हटवण्याच्या कामात अडथळे येत आहेत. युद्धपातळीवर हे काम सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने