‘बाईपण भारी देवा’ची जादू कायम, चित्रपट बनवण्यासाठी निर्मात्यांनी खर्च केलेले फक्त ‘इतके’ रुपये

दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. विशेष म्हणजे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता या चित्रपटाच्या बजेटची चर्चा रंगली आहे.

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट ठरत आहे. या चित्रपटाला महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने दहा दिवसात २६ कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे.या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याच्या अखेरीस १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. तर गेल्या आठवड्यातील रविवारी तब्बल ६.६० कोटींची विक्रमी कमाई केली. यामुळे ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत एका दिवसात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

आता या चित्रपटाबद्दल विविध किस्से समोर येत आहेत. नुकतंच या चित्रपटाचे बजेट किती होते, याचा आकडा समोर आला आहे. बाईपण भारी देवा या चित्रपटाचे बजेट ५ कोटी होते, अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे. पण या चित्रपटाने बजेटच्या तुलनेत पाचपट कमाई केली आहे. तसेच हा चित्रपट ३० ते ३५ कोटींचा गल्ला जमवेल, असे बोललं जात आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब या मुख्य भूमिकेत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने