पाणलोट क्षेत्रात मुसळधार, पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ; राधानगरी, तुळशी, वारणा धरणांत किती आहे साठा?

कोल्हापूर : जिल्ह्यात काल दुपारनंतर पावसाने सुरुवात केली. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांच्या आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा येथे सकाळी ७ वाजता पंचगंगा नदीची पाणीपातळी ११ फूट ५ इंच होती.

हीच पाणीपातळी रात्री १० वाजता १२ फूट ११ इंचापर्यंत गेली आहे. तर इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे. राज्यात पुढील २४ ते ३६ तासांत मॉन्सून सक्रिय होईल, असे वातावरण निर्माण झाले असल्याचे हवामान विभागाचा अंदाज आहे.
जिल्ह्यात गगनबावडा, राधानगरी, आजरा, पन्हाळा तालुका वगळता इतर ठिकाणी पावसाने ओढ दिली आहे. ज्या तालुक्यात पाऊस सुरू आहे, तोही पुरेसा नाही, असे चित्र आहे. काल दुपारी पश्‍चिम भागातून जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. दरम्यान, भोगावती नदीकाठी असणाऱ्या गावांमध्येही जोरदार पाऊस झाल्याने पंचगंगा नदीची पाणीपातळी वाढली आहे.

धरणातील पाणीसाठा कमी होऊ नये, यासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग पूर्णत: कमी केला आहे. गगनबावडा तालुक्यातील घटप्रभा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, यातून ९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पावसाअभावी शिरोळ, हातकणंगले या तालुक्यात पेरण्या रखडल्या आहेत.

दाजीपूर परिसरात अतिवृष्टी

राधानगरी : चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाने दमदार सुरुवात केली आहे. गेल्या २४ तासांत दाजीपूर येथे अतिवृष्टी झाली. येथे १४० मिलिमीटर पाऊस नोंद झाला आहे. त्या खालोखाल राधानगरी धरणस्थळावर ६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे राधानगरी धरण आज ३.७४ टीएमसी म्हणजे ४४.७३ टक्के भरले असून, जलाशयात पाण्याची वाढ सुरू आहे.

धरणसाठा

धरण एकूण क्षमता आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

  • राधानगरी ८.३६ ३.८१

  • तुळशी ३.४७ ०.९८

  • वारणा ३४.३९ १४.६९

  • दूधगंगा २५.३९ ४.६९

  • कासारी २.७७ १.१४

  • कडवी २.५१ १.०९

  • कुंभी २.७१ १.३९

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने