…म्हणून हॉलीवूड अभिनेत्याने वाचली भगवद्गीता, कोण होते ओपेनहायमर? त्यांचं भगवद्गीता अन् संस्कृतशी कनेक्शन काय?

अभिनेता सिलियन मर्फीने चित्रपट निर्माते ख्रिस्तोफर नोलन यांच्या ‘ओपेनहायमर’ चित्रपटाची तयारी करत असताना भगवद्गीता वाचली असा खुलासा केला आहे. मर्फी अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ ज्युलियस रॉबर्ट ओपेनहायमर यांची भूमिका साकारणार आहे. ओपेनहायमर अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जीवनावर आधारित हा २१ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहेत.

या चित्रपटात ओपेनहायमर यांची भूमिका करण्यासाठी भगवद्गीता वाचली, असं अभिनेता सिलियन मर्फीने म्हटलं आहे. “मी चित्रपटासाठी पूर्वतयारी करताना भगवद्गीता वाचली आणि मला वाटलं की तो एक अतिशय सुंदर मजकूर आहे, खूप प्रेरणादायी आहे. भगवद्गीता वाचल्यानंतर ओपेनहायमर यांना दिलासा मिळाला होता, कारण त्यांना त्याची गरज होती,” असं सिलियन मर्फीने सुचिरिता त्यागीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
ओपेनहायमर यांचं भगवद्गीतेशी कनेक्शन

६ व ९ ऑगस्ट १९५४ या दोन दिवशी जपानमधील हिरोशिमा न नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब टाकण्यात आले होते. या घटनेत हजारो लोक मारले गेले होते. या अणुबॉम्बची निर्मिती करणाऱ्या टीमचे प्रमुख ओपेनहायमर होते. बॉम्बने दोन्ही शहरांमध्ये विध्वंस केल्यावर जगभरात अणुबॉम्बची निर्मिती करण्यास सुरुवात झाली. आपणच बनवलेल्या बॉम्बची क्षमता पाहून ओपेनहायमर चिंतातूर झाले होते. नंतरच्या काळात त्यांनीच अणुबॉम्बला विरोधही केला होता.

१९६५ मध्ये ओपेनहायमर यांनी अणुबॉम्बच्या पहिल्या स्फोटाबद्दल भाष्य करताना भगवद्गीतेचा उल्लेख केला होता. युद्धात कृष्ण अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर ते विराट रूप धारण करून अर्जुनला सांगतात की ‘आता मी मृत्यू झालो आहे. आता मी जगाचा नाश करणारा झालो आहे’. दरम्यान, अणुबॉम्ब जपानच्या दोन्ही शहरांवर टाकल्यानंतर ‘आता मी मृत्यू झालो आहे’ हीच ओळ रॉबर्ट ओपेनहायमर वारंवार म्हणायचे.

रॉबर्ट ओपेनहायमर यांना भगवद्गीतेची प्रचंड ओढ होती. १९३० च्या दशकात त्यांचा प्राचीन हिंदू धर्मग्रंथांशी परिचय झाला आणि त्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला. भाषांतर न करता भगवद्गीता वाचायची असं त्यांनी ठरवलं होतं, त्यामुळे ते वाचण्यासाठी ते संस्कृतही शिकले होते. १९३३ मध्ये दर गुरुवारी ओपेनहायमर भगवद्गीता वाचायला जायचे. बर्कले येथे राहणारे आर्थर रायडर नावाचे शिक्षक त्यांना संस्कृत शिकवायचे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने