पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर आज पुन्हा २ तासांचा ब्लॉक; वाहतुकीला पर्याय कोणता? जाणून घ्या...

पुणे : पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर आजही मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. दोन तासांच्या या ब्लॉकमध्ये पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळची सैल झालेली दरड हटवली जाणार आहे. काल रात्री पावणे नऊच्या सुमारास इथं मातीचा ढिगारा कोसळला होता. त्यानंतर आज हा ब्लॉक घेतला जात आहे. दुपारी २ ते ४ दरम्यान मुंबईकडे जाणारी सगळी वाहतूक किवळेपासून वळवली जाणार असून जुन्या पुणे मुंबई महामार्गाने ही वाहतूक मार्गस्थ होईल. लोणावळ्याजवळ पुन्हा द्रुतगती मार्गाशी ही वाहतूक जोडली जाईल. पुण्याकडे येणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरूच राहील. याआधी सोमवारी आणि गुरुवारी असेच विशेष ब्लॉक घेण्यात आले होते. त्यावेळी आडोशी बोगद्याजवळची दरड हटवण्यात आली होती.मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर रविवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली होती. डोंगरावरील सैल झालेली माती व दगड हटवण्यासाठी गुरुवारी दोन तासांचा ब्लॉक घेण्यात आला. या दरम्यान मुंबईकडे जाणारी अवजड वाहने मार्गावर ठिकठिकाणी उभी करण्यात आली होती. कार व इतर हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून खोपोलीमार्गे मुंबईकडे वळवली होती.

रविवारी (२३ जुलै) खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळली होती. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. सोमवारी दुपारी सैल झालेल्या दरडी हटवण्याच्या कामासाठी दोन तासांचा ब्लॉक घेतला गेला; तरीही काही ठिकाणी सैल झालेले दगड व माती दिसल्यामुळे ते हटवण्यासाठी गुरुवारी पुन्हा एकदा दुपारी १२ ते दोन या वेळेत मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर 'ब्लॉक' घेण्यात आला. कार व इतर हलकी वाहने जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून शिंग्रोबा मंदिर घाटातून खोपोली, कर्जतमार्गे मुंबईकडे वळवण्यात आली होती. मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक मात्र सुरळीत सुरू होती.

दरम्यान, याआधी दोन दिवस ब्लॉक घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा दोन तासांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने