उत्तर भारतात पावसाचा कहर, यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी; ‘या’ राज्यांमध्ये भीषण परिस्थिती, वाचा सविस्तर

उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला असून जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. तसंच, येत्या २४ तासांत उत्तर भारतातील काही राज्यांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यात बचावकार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या तैनात करण्यात आल्या असून समुद्रकिनाऱ्यापासून लांब जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या राज्यांना अधिक धोका

हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे लष्कर आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल सक्रिय झाले आहेत. या राज्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली आले आहेत. त्यामुळे वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे.

यमुना नदीने ओलांडली धोक्याची पातळी

हरियाणातून सोडल्या गेलेल्या पाण्यामुळे यमुना नदीनेही धोक्याची पातळी पार केलेली आहे. शनिवार आणि रविवारी दिल्लीमध्ये १५३ मिमी पावसाची नोंद झाली. “इतक्या प्रचंड पावसाला सामोरे जाण्याची आमची तयारी नव्हती”, अशी कबुली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. यमुना नदीत पाण्यची पातळी २०६.२४ मीटरवर आली आहे. तर, उच्च पूर पातळी २०७.४९ मीटर आहे. केंद्रीय जल आयोगाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. दिल्ली सरकारने पूरप्रवण क्षेत्र आणि यमुनेच्या पाण्याच्या पातळीचे निरीक्षण करण्यासाठी १६ नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.हिमाचल प्रदेशात मुसळधार

अतिमुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेश येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या राज्यातील जनतेचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. २४ जूनपासून हिमाचल प्रदेशमध्ये ७२ जणांनी आपला जीव गमावला असल्याचे वृत्त इंडिया टीव्हीने दिले आहे. भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ संदीप कुमार शर्मा म्हणाले की, सोलन, शिमला, सिरमौर, कुल्लू, मंडी, किन्नौर आणि लाहौलमध्ये पुढील २४ तासांसाठी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, उना, हमीरपूर, कांगडा आणि चंबामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंडी, किन्नौर आणि लाहौल स्पीतीमध्ये पुढील २४ तासांसाठी पूर येण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.” त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महामार्ग बंद, वाहतूक खोळंबली

पावसामुळे शिमला-काल्का महामार्ग बंद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकट्या शिमला जिल्ह्यात १२० पेक्षा जास्त रस्ते बंद पडले आहेत, तर ४८४ जलपुरवठा योजनांना फटका बसला. मनालीत अडकलेल्या २० जणांची सुटका करण्यात यश आले, मात्र राज्यात विविध ठिकाणी २०० पेक्षा अधिक लोक अडकून पडले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

हिमाचल प्रदेशात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्याने मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. शिमल्यामध्ये भूस्खलनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन दिवसांमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये १६ ते १७ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत राज्याचे तीन हजार कोटींचे नुकसान झाले आहे. राज्याने गेल्या ५० वर्षांमध्ये इतका सर्वत्र मुसळधार पाऊस पाहिला नव्हता”, असे त्यांनी सांगितले.

हेल्पलाईन नंबर जारी

“नैसर्गिक आपत्तीच्या या काळात हिमाचल प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे विनाकारण प्रवास करणे टाळा. नदी नाले, समुद्र किनाऱ्यापासून लांब राहा. सरकार, १२ NDRF टीम आणि भाजपा मदतीसाठी प्रत्येक क्षणी तयार आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ९३१७२२१२८९, ८५८०६१६५७० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा”, असे आवाहन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशातही अलर्ट

उत्तर प्रदेशच्या ४४ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील ३ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. अलीकडेच सहारनपूर जिल्ह्यातून अग्निशमन दलाच्या पथकाने ज्येष्ठ नागरिकांसह ४२ जणांची सुटका केली. जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि धामोळा नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने हे सर्वजण पाण्यात अडकले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

उत्तर बिहारही धोकाप्रवण क्षेत्रात

उत्तर भारतात सर्वत्र पावसाने थैमान घातले असून उत्तर बिहारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर, दक्षिण बिहारमध्ये वादळी वाऱ्याची शक्यता आहे.

हरियाणात ७३० विद्यार्थीनींची सुटका

हरयाणातही पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी नागरिक अडकून पडले आहेत. चमन वाटिका कन्या गुरूकूल शाळेत काल ७३० विद्यार्थींनी अडकून पडल्या होत्या. लष्कर, एनडीआरएफ आणि पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या प्रयत्नांमुळे ७३० विद्यार्थींनींची सुटका करण्यात आली.

उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेवर परिणाम

“दरवर्षी पावसाळ्यात आपल्याला नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. हा ऋतू येताच आम्ही अलर्ट मोडवर आलो होतो. आम्ही सर्व चारधाम यात्रेकरूंना सतर्क राहण्याची विनंती करत आहोत. हवामानाची दखल घेत कंवर यात्राही सुरू आहे. अनेक ठिकाणी पाऊस पडत असून प्रशासन त्यावर लक्ष ठेवून आहे”, अशी प्रतिक्रिया उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली.

परिस्थितीवर लक्ष..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली. तर मुसळधार पावसाचा फटका बसलेल्या राज्यांना पीएम केअर निधीमधून अतिरिक्त मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी केंद्र सरकारकडे केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने