रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासवांमधील काही श्रीलंकेहून येत असल्याचा निष्कर्ष टॅगिंग केलेल्या बागेश्रीच्या प्रवासातील अभ्यासातून काढण्यात आला आहे. गुहागर येथे समुद्रात सोडलेले आलेले हळूहळू मार्गक्रमण करीत श्रीलंकेपर्यंत पोचले आहे.
काही कासवं ही अरबी समुद्रात लक्षद्धीपच्याजवळ वास्तव्य केल्यावर अंडी देण्यासाठी पुन्हा कोकण किनारपट्टीवर दाखल होत असावीत, असाही अंदाज आहे. याला सुरेशकुमार यांनी दुजोरा दिला. कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी दरवर्षी येतात.
गेल्या काही वर्षांत त्यांचे प्रमाण वाढले आहे. या कासवांच्या संवर्धनासाठी वन विभागाने कांदळवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून संशोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा दुसऱ्या टप्प्यात गुहा आणि बागेश्री ही दोन कासवं सॅटेलाइट टॅगिंग करून समुद्रात सोडण्यात आली आहेत. त्यातील गुहा हे कासव अरबी समुद्रात महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेजवळ आहे.
त्याचा प्रवास किनारी भागातून खोल समुद्राकडे सुरू आहे. मात्र, बागेश्री हे कासव गुहागर येथून प्रवास करीत दक्षिणेकडे रवाना झाले आहे. ते कन्याकुमारीपर्यंत पोचल्यानंतर पुढील प्रवासाबाबत उत्सुकता होती. आठवडाभरात बागेश्री श्रीलंकेत पोचले आहे. सध्या ते कोलंबोच्या किनारपट्टीपासून सुमारे १५० किलोमीटरवर आहे. कोकण किनारपट्टीवर येणारी कासवं ही श्रीलंकेमधून येत असावीत, असा अंदाज वर्तविला आहे.
याबाबत अभ्यासक सुरेशकुमार म्हणाले, बागेश्री कासव गुहागर येथून थेट श्रीलंकेकडे रवाना झाले. ते अधेमधे कुठेच थांबलेले नाही. यावरुन त्या कासवाचा मार्ग निश्चित होता असे स्पष्ट होते. श्रीलंकेच्या दरम्यान, समुद्रातील पाण्यात कासवांना आवश्यक खाद्य मिळते. त्यामुळे त्यांचे ते वास्तव्याचे ठिकाण असावे.
तसेच गुहा आणि पहिल्या टप्प्यातील रेवा कासव यांचे वास्तव्याची ठिकाणे समान आहेत. यावरुन कोकणात अंडी घालण्यासाठी अरबी समुद्र आणि श्रीलंका येथून कासवं येतात हे स्पष्ट होते. बागेश्री पुन्हा कोकणात येणार का यावर पुढील सर्वकाही अंदाज अवलंबून राहणार आहे. तसं झाले तर एकदा अंडी घालून गेलेली कासवं पुन्हा त्याच ठिकाणी येतात याला पुष्टी मिळेल.