समृद्धी महामार्गावर आज (शनिवार) पुन्हा एक मोठा अपघात झाला. नागपूरहून पुण्याला येणाऱ्या एका खासगी बसला आग लागल्यामुळे २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. बसचा टायर फुटल्याने बस दुभाजकाला धडकली, आणि बसने पेट घेतला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा वर आला आहे. समृद्धी महामार्ग हा सिमेंटचा वापर करून बनवण्यात आला आहे. सिमेंटच्या रस्त्यांवर गाडी चालवत असताना टायर फुटण्याचा धोका डांबरी रस्त्यांच्या तुलनेत अधिक असतो. सध्या राज्यातील बहुतांश रस्त्यांवर सिमेंटचा वापर केला जातो आहे. अशा परिस्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी टायरची काळजी घेणं गरजेचं आहे.
टायर फुटण्याची अनेक कारणं
टायर फुटण्याची अनेक कारणं आहेत. यामध्ये टायरचं आयुष्य, भरलेली हवा, गाडीचा वेग, रस्त्यांची परिस्थिती, बाहेरचं वातावरण अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश होतो. यातील रस्त्यांची परिस्थिती आणि वातावरण या गोष्टी तर आपल्या हातात नाहीत. मात्र, बाकी गोष्टींबाबत आपण नक्कीच खबरदारी घेऊ शकतो.
टायरच्या खाचा तपासा
तुम्ही टायरवर विविध प्रकारच्या खाचा पाहिल्या असतील. या खाचा १.५ मिलिमीटर खोल असाव्यात. तुम्ही जेवढा जास्त टायर वापराल, तेवढ्या त्या खाचा गायब होतात. जर तुमच्या टायरवर अशा खाचा दिसत नसतील, आणि संपूर्ण चाक गुळगुळीत दिसत असेल; तर तुम्हाला त्वरीत तो बदलून घेण्याची गरज आहे.
टायरमधील हवा
साधारणपणे प्रवासापूर्वी ३२ ते ३३ बास इतकी हवा टायरमध्ये भरली जाते. अधिक वेळ वाहन चालविल्याने टायरमधील हवा प्रसरण पावते आणि हे प्रमाण ४५ ते ५० पर्यंत पोहोचते. यामुळे टायर फुटण्याचा धोका बळावतो. म्हणूनच टायरमध्ये नायट्रोजन भरत असताना ‘अलायमेंट’ तपासायला हवी.
गाडीचा वेग
भारतातील गाड्यांचा वेग हा ६० ते ८० किलोमीटर प्रतितास वेगाने असेल हे गृहित धरून इथल्या कंपन्या टायर्स डिझाईन करतात. त्यामुळे त्यापेक्षा जास्त वेगाने गेल्यावर टायर फुटण्याचा धोका वाढतो. म्हणूनच, सुरक्षेसाठी गाडीचा वेग मर्यादित ठेवणं गरजेचं आहे.