तलाठी परीक्षेत गोंधळ! राज्यात अनेक जिल्ह्यात सर्व्हर डाऊन; हजारो परीक्षार्थी खोळंबले

तलाठी भरतीसाठी आयोजीत करण्यात आलेल्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी भरतीची परीक्षा आज (२१ ऑगस्ट) पार पडत आहे. मात्र राज्यातील संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात परीक्षेआधीच सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातीस बाभूळगाव आणि कापशी येथील परीक्षा केंद्रांवर हजारो विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेसाठी सकाळी ९ ते ११ ही परीक्षेची वेळ होती. मात्र अचानक सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांची नोंदणी बंद पडली. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची वेळ होऊन देखील परीक्षा केंद्राबाहेरच थांबवे लागत आहे. नागपूरमध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे. नागपूर येथील बीएमव्ही महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर देखील विद्यार्थांना वर्ग खोल्यात प्रवेश मिळत नसल्याची तक्रार समोर आली आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात हाच प्रकार समोर आला असून यामुळे परीक्षा केंद्रांच्या बाहेर परीक्षेसाठी दूरून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाला आहे. ज्या कंपनीकडे या परीक्षा घेण्याची जबाबदारी आहे त्या कंपनीकडून अद्याप विद्यार्थ्याना कुठलीही माहिती देण्यात आलेली नाहीये.

१० लाख ४१ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज

महसूल विभागाकडून तलाठी पदाच्या ४६४४ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी तब्बल १० लाख ४१ हजार इच्छूकांनी या पररीक्षेसाठी अर्ज भरले आहेत. तसेच या परीक्षेच्या फी वरून देखील काही दिवसांपूर्वी मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले होते. आता या परीक्षेत गोंधळ झाल्याने हा मुद्दा पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने