महिलांनो संधीवाताने त्रस्त आहात? आयुर्वेद सांगतं मुळापासून सुटकेचा उपचार

संधिवात म्हणजे सांधा किंवा त्याच्या आजूबाजूला दुखणे. दोन हाडांमधील हालाचालीत अडथळा आला की, सांधेदुखी निर्माण होते. यालाच संधीवात म्हणतात. महिलांची बैठी जीवनशैली, दुखणे अंगावर काढण्याची सवय यामुळे महिलांमध्ये संधीवात आढळतो. संधिवाताचे आयुर्वेदातून उच्चाटन शक्‍य आहे. लक्षणांपेक्षा आयुर्वेदात दोष चिकित्सा केंद्रस्थानी ठेवून आहार विहारातून संधिवातावर मात करणे शक्‍य आहे, असा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. राहुल राऊत यांनी दिला.

जैविक घटक, गुणसूत्रांमध्ये होणाऱ्या बदलांमुळेही वातरोगाची समस्या निर्माण होते. आनुवंशिकता हे एक प्रमुख कारण आहे. कुटुंबात एका महिलेला हा त्रास असेल तर मुलींना, बहिणींमध्येही सांधेदुखीचा आजार आढळतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या हाडांची झीज तीनपट अधिक असते.
वयोमानानुसार वजन वाढते. त्याचवेळी व्यायाम, सकस आहाराकडे त्यांचे दुर्लक्ष होते. यामुळे गुडघे दुखी सुरू होते. एका सर्वेक्षणात शहरी भागात १४ टक्के शहरी, तर १८ टक्के ग्रामीण महिला सांधेदुखीने त्रस्त असल्याचे आढळले आहे.

महिलांमधील सांधेदुखीचे कारण...

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये सांधेदुखीचे प्रमाण अधिक असल्याची तपासणीत आढळले आहे. महिलांना सांधेदुखी होण्याचे प्रमुख कारण म्हणजे स्थूलता, गर्भारपणा, बाळंतपणानंतर शरीरातील कॅल्शिअमच्या प्रमाणात होणारी घट. ही तूट भरून काढण्यासाठी संतुलित आहारासह, ठराविक वयानंतर कॅल्शीयमवाढीसाठी औषधोपचारही करण्यात येतात.

मात्र सवयीप्रमाणे याकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी शरीरातील कॅल्शिअमची झीज भरून निघत नाही. हाडांचा ठिसूळपणा वाढतो. हाडे झीजण्याचे प्रमाण वाढते. वाढत्या वजनामुळे महिलांच्या गुडघ्यांवर दाब येतो, हा दाब वाढत गेल्यामुळे सांधेदुखीचे प्रमाण वाढते तसेच रजोनिवृत्तीनंतर महिलांना संधिवाताचा त्रास होतो.

वातावरण बदलताच...

मनगट, कोपर, खांदे, गुडघ्यात सांध्याचा त्रास जाणवतो

सांध्यांचे दुखणे

सांध्यांना सूज येणे

दोन सांध्यात आवाज होणे

मांसपेशीतील वेदना

प्रतिबंधात्मक उपाय

नियमित व्यायाम

सकस व संतुलित आहार

गार पाण्याचा संपर्क टाळावा

मांडी घालून बसणे टाळावे

हरभरा डाळ, वटाणे, बटाटे हे वातूळ खाद्यपदार्थ वर्ज्य करावे

अतिगार फ्रिजचे पाणी टाळावे

ढगाळ वातावरण आणि थंडीत संधिवात रुग्णांना असह्य वेदना होतात. यात महिला रुग्ण अधिक असल्याचे आढळते. जुना संधिवातही थंड वातावरणात बळावतो. सांधेदुखीच्या जोडीला ताप, सांध्यांवर सूज ही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा. आवश्‍यक त्या चाचण्या करून घेत उपचार करावे. अन्यथा संधीविकार वाढीस लागून अपंगत्व येण्याचा धोका आहे. आयुर्वेदात स्वस्तातील उपचार आणि नियंत्रण शक्य आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने