पाऊस, श्रावण आणि उपास यांचं काय कनेक्शन?

संपूर्ण वर्षाच्या सहा ऋतूंमध्ये इतर कोणत्याही ऋतूमध्ये नसतील एवढे उपवास पावसाळ्यामध्ये असतात. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा व्रताच्या दिवशी अन्नत्याग करुन उपवास करण्याची सुरुवात होते ती देवशयनी आषाढी एकादशी, श्रावणी सोमवारचे उपवास, मंगळागौरी पूजन, गुरूवारचे व्रत, गुरुपौर्णिमा, नारळी पौर्णिमा(रक्षाबंधन), नागपंचमी, गोपाळकाला, हरितालिका वगैरे विविध सण आणि व्रतांच्या निमित्ताने सुरुच राहते.
संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये मांसाहार टाळून शाकाहार करण्याचे व्रत सांगण्यात आलेले आहे. मुसलमान बांधवांचे रोझे आणि जैनधर्मीयांचे पर्युषण सुद्धा याच ऋतूमध्ये असते हे विशेष. पावसाळ्यातील दिवसांमध्येच सण-व्रते आणि त्या निमित्ताने उपवास एवढ्या मोठ्या प्रमाणावर का सांगितले असावीत? धर्मपालन हे त्यामागचे उद्दिष्ट असले तरी धर्मपालन करताना मनुष्याकडून आरोग्याच्या नियमांचे पालन होईल, याची काळजी घेतलेली दिसते. पावसाळ्यातील अनारोग्यकर वातावरण व त्यामुळे शरीरामध्ये घडणार्‍या अहितकारक घडामोडी, विकृत बदल शरीराला कमीतकमी बाधक व्हाव्यात,याच हेतूने हे उपवास सांगण्यात अलेले आहेत, यात काही शंका नाही. धर्मपालन म्हटल्यावर नाठाळातला नाठाळ मनुष्यसुद्धा व्रतपालन करायला तयार होतो, अन्यथा “हे व्रत तुझ्या आरोग्यासाठी हितकर आहे,म्हणून तू ते कर” ,असे सांगितले तर त्या व्रताचे पालन करण्यात कोणी उत्साह दाखवणार नाही. धर्मपालनाच्या निमित्ताने समाजाकडून आरोग्य-नियमांचे पालन करून घेणार्‍या आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करावे थोडेच!

पावसाळ्यात उपवास का?

पावसाळ्यामधील व्रत-वैकल्याच्या निमित्ताने उपवास करण्याचे जे मार्गदर्शन धर्मशास्त्राने केले आहे, त्यामागे अग्नीमांद्य हे एक मुख्य कारण आहे. अग्नीमांद्य म्हणजे अग्नीची दुर्बलता. आयुर्वेदाने अग्नी म्हणून संबोधलेले तत्त्व हे शरीरव्यापी असून दीपन-पचन-विक्षेपण व उत्सर्जन ही सर्व कार्ये अग्नी करतो. दीपन म्हणजे अन्नसेवनाची इच्छा व भूक (hunger), पचन म्हणजे स्थूल अन्नाचे सूक्ष्म अन्नकणामध्ये व पाचक स्रावांच्या साहाय्याने अन्नरसामध्ये रुपांतर (fragmentation & digestion), विक्षेपण म्हणजे योग्य पचन झालेल्या अन्नरसाची सर्व शरीर-धातुकडे (body-tissues) पाठवणी (transportation) व उत्सर्जन म्हणजे अन्न-पचन करताना तयार होणार्‍या टाकाऊ भागाचे विसर्जन (excretion) करणे. अग्नीच्या या सर्व कार्यामुळेच आरोग्याच्या दृष्टीने अग्नीला सर्वाधिक महत्त्व आयुर्वेदाने दिले आहे.

कडक उन्हाळ्याच्या ग्रीष्म ऋतूमध्ये मंद असणारा अग्नी प्रावृट्‌-वर्षाऋतुमध्ये (पावसाळ्यामध्ये) अधिकच मंद होतो. साहजिकच वर सांगितलेली अग्नीची कार्ये व्यवस्थित होत नाहीत. ना भूक नीट लागत,ना अन्नामध्ये रुची, ना खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत, ना पाचित अन्नाच्या आहाररसाचे शरीरभर विक्षेपण, ना ना टाकाऊ मलपदार्थांचे योग्य विसर्जन बरोबर होत! बरं,असं असूनही अग्नीचा अंदाज न घेऊन जे दामटून खाण्याचा प्रयत्न करतात, त्यांना या दिवसांमध्ये या नाहीतर त्या आरोग्य-समस्यांना तोंड द्यावे लागते. आयुर्वेदाने या ऋतुमध्ये अन्नाचे अजीर्ण होणार नाही याची कटाक्षाने काळजी घेण्यास सांगितले आहे(…अजीर्णं च वर्जयेत्तत्र यत्नतः׀सुश्रुत संहिता ६.६४.१३) व अजीर्ण टाळण्याचा आणि अग्नी (भूक,पचनशक्ती व चयापचय) प्राकृत करण्याचा सहजसोपा उपाय म्हणजे लंघन अर्थात उपवास!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने