केंद्र सरकारने आजपासून भारतात लॅपटॉप, टॅब्लेट आणि वैयक्तिक संगणकांच्या आयातीवर तात्काळ निर्बंध घालण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. देशांतर्गत स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. HSN 8471 अंतर्गत लगावण्यात आलेल्या निर्बंधांची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत फॉरेन ट्रेड महासंचालनालयाने एका नोटीसमध्ये माहिती दिली आहे.
नोटीसमध्ये म्हटल्याप्रमाणे, “एचएसएन 8741 अंतर्गत येणारे लॅपटॉप, टॅब्लेट, ऑल-इन-वन पर्सनल कॉम्प्युटर आणि अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर कॉम्प्युटर आणि सर्व्हरची आयात ‘प्रतिबंधित’ असेल. मर्यादित आयातीचा परवाना असलेल्यांनाच आयातीची अनुमती देण्यात येईल.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सदर निर्बंध हे बॅगेज नियमांतर्गत होणाऱ्या आयातीवर लागू होणार नाहीत असेही स्पष्ट केले आहे. तसेच पोस्ट किंवा कुरिअरद्वारे ई-कॉमर्स पोर्टलवरून खरेदी केलेल्या लॅपटॉप, टॅब्लेट, ऑल-इन-वन पर्सनल कॉम्प्युटर किंवा अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर कॉम्प्युटरच्या आयातीसाठी ‘आयात परवाना’ आवश्यकतांमधून सूट प्रदान करण्यात आली आहे. यासाठी आयातींवर विशिष्ट शुल्क सुद्धा आकारले जाईल.
याशिवाय रिसर्च अँड डेव्हलपमेंट (संशोधन आणि विकास) चाचणी, मूल्यांकन, दुरुस्ती आणि पुनर्निर्यात, व उत्पादन विकासाच्या उद्देशाने प्रति खेप २० पर्यंत (नमूद केलेल्या) इलेक्ट्रॉनिक सामग्रीच्या आयातीला परवान्यातून सूट प्रदान केली जाणार आहे. या वस्तूंच्या दुरुस्तीसाठी आणि परत करण्यासाठी प्रतिबंधित आयातीचा परवाना आवश्यक नसेल.
याशिवाय मंत्रालयाने विशेष नमूद केले की, “आयात केलेल्या वस्तूंचा वापर केवळ नमूद केलेल्या उद्देशांसाठी केला जाईल व यांची अन्यथा विक्री होणार नाही या अटीच्या अधीन राहूनच आयातीला परवानगी दिली जाईल, उद्दिष्ट पूर्ण होताच, उत्पादने एकतर नष्ट केली जातील, किंवा पुन्हा निर्यात करण्यात येतील”.
Dell , Acer, Samsung, LG, Panasonic, Apple Inc (AAPL.O), Lenovo <0992.HK> आणि HP Inc (HPQ.N) या भारतीय बाजारपेठेत लॅपटॉप विकणाऱ्या काही प्रमुख कंपन्या आहेत आणि या कंपन्यांच्या उत्पादनांसाठी चीनसारख्या देशांतून मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. या ऐवजी भरतीत बाजारपेठेत स्वदेशी उत्पादनांची निर्मिती व विक्री व्हावी या उद्देशाने आयातीवर निर्बंध लगावण्यात आले आहेत.