गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीत रात्री बारानंतर साउंड सिस्टीमसह पारंपरिक वाद्यांवर बंदी!

कोल्हापूर : मध्यरात्री बारानंतर नियमातील साउंड सिस्टीम आणि पारंपरिक वाद्यांनासुद्धा बंदी असल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी येथे दिली. त्यामुळे सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीतसुद्धा रात्री बारानंतर शांतता असणार आहे.

सिस्टीमच नव्हे, तर पारंपरिक वाद्य वाजविले तरीही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचा इशारा टिके यांनी दिला आहे. दरम्यान, रात्री दहानंतर देखाव्यांसाठी वापरलेला नियमांतील स्पीकरसुद्धा बंद करावा लागल्यामुळे गेले दोन दिवस कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
उपअधीक्षक टिके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नियमावलीनुसार गणेशोत्सवात पहिल्या, आठव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी सकाळी सहा ते रात्री बारापर्यंत नियमात सिस्टीम आणि पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी आहे. मात्र, इतर दिवशी ही मर्यादा रात्री दहापर्यंतच आहे. ही मर्यादा देखाव्यांसाठी असलेले स्पीकरवरसुद्धा लागू आहे.

दरम्यान, शहरासह जिल्ह्यात २६, २७ आणि २८ सप्टेंबरलाच केवळ रात्री बारापर्यंत नियमातील साउंड सिस्टीम आणि पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी आहे. ‘सायलेंट झोन’मध्ये या दिवशीही वाद्ये किंवा नियमातील साउंड सिस्टीम वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे आजपासून केवळ पुढील तीन दिवस देखाव्यांतील स्पीकर रात्री बारापर्यंत सुरू राहणार आहेत. सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीतसुद्धा आवाजाची मर्यादा आणि वेळ पाळावी लागणार आहे.

त्यानुसार रात्री बारानंतर साउंड सिस्टीम किंवा पारंपरिक वाद्ये सुद्धा बंद करावी लागणार आहेत. अशी वाद्ये किंवा साउंड सिस्टीम सुरू ठेवली जाईल, त्या मंडळांवर थेट ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार गुन्हे दाखल होणार आहेत. यामध्ये मंडळाच्या अध्यक्षांसह वाद्ये किंवा सिस्टीम मालकांवरही गुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळे यंदाही सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत रात्री बारानंतर शांतता असण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने