कॅनडाच्या नागरिकांना भारतात प्रवेश बंद; मोदी सरकारचा दणका! अनिश्चित काळासाठी व्हिसा देणं थांबवलं

खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येनंतर भारत-कॅनडा संबंधांमध्ये तणाव निर्माण झाले आहेत. यानंतर मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. कॅनडाच्या नागरिकांना भारताचा व्हिसा देणं अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आलं आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली, तरी कॅनडामध्ये व्हिसा केंद्रांचं संचालन करणाऱ्या बीएलएस इंटरनॅशनल वेबसाईटवर याबाबत माहिती दिली जात आहे.

BSL इंटरनॅशनल वेबसाईटचा एक स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये "भारतीय व्हिसा सुविधा ही पुढील सूचना येईपर्यंत थांबवण्यात आली आहे" अशी सूचना दिली जात आहे. ही सूचना कॅनडातील इंडियन मिशनकडून दिली असल्याचंही या वेबसाईटवर सांगण्यात येत आहे.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. भारताने हे आरोप फेटाळत; कॅनडा खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर्सना आश्रय देत असल्याचं म्हटलं होतं. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.

या वादामुळे दोन्ही देशांनी आपापल्या नागरिकांसाठी सूचना जारी केल्या होत्या. कॅनडामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय उपस्थित आहेत. तसंच भारतात देखील कॅनडातील बरेच पर्यटक आणि विद्यार्थी येत असतात. यामुळे दोन्ही देशांमधील तणावाचा फटका या विद्यार्थी, कर्मचारी आणि पर्यटकांना बसताना दिसत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने