राखीव दिवशीही कोलंबोत पाऊसच पाऊस... भारत-पाकचा सलग दुसरा सामना पुन्हा होणार रद्द?

कोलंबो : आशिया चषक २०२३ मध्ये सध्या सर्वात मोठी चिंतेची बाब ठरला आहे तो म्हणजे श्रीलंकेतील पाऊस. पावसाने तर आशिया चषकामध्ये भारताची पाठ काही सोडलेली नाही. आशिया चषक स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण ३ सामने खेळले असून तिन्ही सामन्यांमध्ये इंद्रदेवाने मुसळधार पाऊस पाडला आहे. १० सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सुपर फोर सामन्यात भारताच्या डावात मुसळधार पाऊस पडला. पावसाचा जोर इतका होता की रविवारी सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही.

ACC म्हणजेच आशियाई क्रिकेट परिषदेने या मोठ्या सामन्यासाठी राखीव दिवस देखील ठेवला आहे. ११ सप्टेंबर रोजी राखीव दिवशी सामना काल जिथे सोडला होता तिथून सुरू होईल (भारताने २४.१ षटकात २ बाद १४७ धावा केल्या होत्या). पण आता प्रश्न पडतो की आज कोलंबोमध्ये हवामान कसे आहे? आजही सामना पूर्ण होईल की नाही? कोलंबोमधील आजचा हवामानाचा अंदाज नेमका कसा आहे; जाणून घेऊया.११ सप्टेंबरला कोलंबोमध्ये हवामान कसे असेल?

११ सप्टेंबरला सोमवारीही कोलंबोच्या हवामानात कोणताही बदल होणार नाही. ५० षटके सोडा, सामना पूर्ण करणेही हवामान पाहता शक्य वाटत नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार कमाल तापमान ३० अंशांवर जाणार असून पावसाची शक्यता ९७ टक्क्यांपर्यंत आहे. आर्द्रता ८१ टक्के राहील. दुपारी अंदाजे १७.९ मिमी पाऊस अपेक्षित आहे. संध्याकाळी पावसाची शक्यता ८० टक्के असेल पण आकाशात ढगांचे आच्छादन १०० टक्के राहील.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान:

फखर जमान, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, सलमान अली, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रौफ.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने