“मला भारताचा जावई म्हणून…”, ऋषि सुनक यांनी सांगितलं G20 साठी येण्याचं खास कारण; म्हणाले, “एकट्याने..”

९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या शिखर परिषदेत, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासह अनेक नेते सहभागी होणार आहेत. जी २० शिखर परिषदेसाठी आलेल्या ऋषी सुनक यांनी एका खास व्हिडिओतून भारतात येण्याच्या खास कारणांची यादी सांगितली आहे. जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी एकट्याने काम करून काहीही होणार नाही, म्हणूनच सर्वांचे सहकार्य मिळवण्यासाठी आपण भारतात आलो आहोत असेही ते म्हणाले.
प्राप्त माहितीनुसार ऋषि सुनक हे त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह काल दिल्लीत दाखल झाले. तुम्हाला माहित असेल की, अक्षता या इन्फोसिस या कंपनीचे सह- संस्थापक नारायण मूर्ती व सुधा मूर्ती यांच्या कन्या आहेत. ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांचे स्वागत करताना दिसत होते. यानंतर ऋषी सुनक व अक्षता मूर्ती यांनी दिल्लीत ब्रिटिश काउन्सिलच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सुनक यांनी या व्हिडीओ व्हॉइस ओव्हर देत सांगितले की, “सोप्या भाषेत सांगायचे तर, जागतिक समस्या महत्त्वाच्या आहेत, आपण फक्त एकटे काम करू शकत नाही. सर्व देशांना एकत्र काम करावे लागेल, कोविडच्या काळात आपण एकमेकांच्या मदतीचे महत्त्व ओळखले आहे.हवामान बदलापासून ते पुतीन यांनी पुकारलेल्या बेकायदेशीर युद्धाच्या विरुद्ध सर्व विषयांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आलो आहोत.”

“G20 व अशा शिखर परिषदांमुळे इतर देशांच्या नेत्यांशी प्रत्यक्ष बोलण्याची आणि समस्यांचे निराकरण करण्याची एक संधी मिळते. या चर्चांमधून घेतले जाणारे निर्णय हे ब्रिटिश नागरिकांना त्यांच्या पंतप्रधानांकडून अपेक्षित असलेल्या नोकरीच्या संधी, प्रगती व सुरक्षा प्रदान करतील अशा आशेसह आम्ही भारतात आलो आहोत.

दरम्यान, काल ऋषि सुनक यांनी आगमनानंतर, दिल्लीतील भेट ही निश्चितच खास असल्याचे म्हटले होते. सूनक म्हणाले की , मी कुठेतरी पाहिले की मला ‘भारताचा जावई’ म्हणून संबोधले गेले आहे, मला आशा आहे की हे भारतीयांचे प्रेम आहे.”

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने