अंबाबाई मंदिरात प्लास्टिक पिशव्यांना मनाई

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी आता पूर्ण होत असून, आज मंदिरातील संबंधित सर्व घटकांची बैठक झाली. उत्सव काळात मंदिरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये, अशा सक्त सूचना यावेळी दिल्या. त्याशिवाय कर्मचाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक असून, भाविकांशी आदराने वागावे, अशाही सूचना दिल्या. दरम्यान, मंदिर परिसर आता विद्युतरोषणाईने उजळून निघाला आहे.

देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, सहाय्यक सचिव शीतल इंगवले, व्यवस्थापक महादेव दिंडे आदींच्या उपस्थितीत बैठक झाली. विद्युत जोडणी प्रमाणपत्र घेणे, दुकानातील कामगारांनीही ओळखपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्या नावाची यादी देवस्थान समितीकडे देणे, अग्निरोधक यंत्रणा सुसज्ज ठेवणे, देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र व कार्यालयीन गणवेशाचाच वापर करणे आणि वेळेवर हजर राहणे आदी सूचना यावेळी केल्या.
इंडोकाउंट फाउंडेशनतर्फे स्टील मोबाईल टॉयलेट व्हॅन

श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी इंडोकाउंट फाउंडेशनने महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्टेनलेस स्टीलमधील मोबाईल टॉयलेट व्हॅन दिल्या आहेत. या व्हॅन बिंदू चौक येथील वाहनतळाच्या ठिकाणी बसवण्यात येणार असून, आज त्या देवस्थान समितीकडे सुपूर्द केल्या.

यावेळी इंडोकाउंट फाउंडेशनचे संचालक कमाल मित्रा, महाव्यवस्थापक संदीप कुमार, सहायक महाव्यवस्थापक राजेश मोहिते, वरिष्ठ सीएसआर सल्लागार अमोल पाटील, अमर यादव, माजी नगरसेवक आदिल फरास आदी उपस्थित होते.

अतिक्रमण निर्मूलन कारवाई योग्यच

श्री अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजाशेजारील चप्पल स्टॅंड महापालिकेने मंगळवारी हटवली. ही कारवाई कायदेशीरच आहे. जीवन पाखरे व गणेश पाखरे यांना पंधरा दिवसांत स्टॅंड काढून घेण्याबाबतची नोटीस २८ सप्टेंबरला दिली आहे. पाखरे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात गरुड मंडपाशेजारील स्टॅंडचा उल्लेख आहे.

दक्षिण दरवाजाशेजारी त्यांना कुठलीही परवानगी दिलेली नाही. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दोन मे रोजी ही स्टॅंड सुरक्षिततेच्या कारणास्तव हटवण्याविषयी महापालिकेला पत्र दिले आहे. त्यानुसार ही कारवाई झाली आहे, असे महापालिकेने दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने