वर्क फ्रॉम होमचा शेवट? TCS चा घरून कामाला ‘टाटा’; कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये हजेरी लावण्याचे फर्मान

गेल्या तीन वर्षांत जगभर काम करण्याच्या पद्धतीमध्ये कमालीचा बदल झाला आहे. करोनाचा प्रसार वाढू नये यासाठी लोकांना घरून काम करण्यास सांगण्यात आले होते मात्र, आता करोनाचा शेवट झाला असल्यामुळे बऱ्याच कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कार्यालयात बोलावण्यास सुरुवात केली आहे.

भारतातील आयटी क्षेत्रातील नामांकित कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) मागच्या वर्षीच सर्व कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये परतण्यासाठी अधिकृत ईमेल केला होता आणि आता TCS ने कोविड-१९ संसर्गाच्या काळात सुरू झालेली 'वर्क फ्रॉम होम' प्रणाली संपवत आपल्या सर्व ६.१४ लाख कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करण्याचे नवीन फर्मान जारी करत बुधवारी याची घोषणा केली. असे पाऊल उचलणारी TCS ही पहिली मोठी आयटी कंपनी आहे.
ऑफिसमध्ये काम केल्याचे फायदे

टीसीएसचे एचआर हेड मिलिंद लक्कड म्हणाले की, 'कंपनीचा विश्वास आहे की ऑफिसमध्ये एकत्र काम केल्याने उत्पादकता वाढते. त्यामुळे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात येण्यास सांगितले आहे. तसेच आमचा ठाम विश्वास आहे की नवीन कर्मचारी अनुभवी टीसीएस कर्मचाऱ्यांसह एकत्रित होतील. आणि हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे ते TCS मूल्ये आणि दृष्टिकोन शिकतील, समजून घेतील आणि आत्मसात करतील. यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांना आठवड्यातील सर्व दिवस ऑफिसमध्ये येण्यास सांगत आहोत.'

लक्कड पुढे म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत कंपनीने अनेक नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे आणि त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये समान मूल्ये असणे महत्त्वाचे आहे. २०२५ पर्यंत कंपनीतील उपस्थित लोकांची संख्या २५% कमी करण्याच्या अजेंड्याशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की आम्ही हे सांगू शकत नाही.

७०% कर्मचाऱ्यांचे ऑफिसमधून काम सुरू

सीओओ म्हणाले की, गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात भरती आणि सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात आणणे गरजेचे झाले आहे. ७०% कर्मचारी कार्यालयात येऊ लागले आहेत. कोविड-१९ ची घोषणा झाल्यानंतर सात-दहा दिवसांत कंपनीने वर्क फ्रॉम होम पद्धतीचा अवलंब केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने