हेल्दी किंवा निरोगी राहण्यासाठी पोषक त्तव असलेल्या पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करणं गरजेचं आहे. अलिकडे जीवनमान आणि खाण्या-पिण्याच्या सवयी बदलू लागल्याने जंक फूड, फ्रोझन पदार्थ किंवा पोषक तत्व नसलेल्या इंस्टंट पदार्थांचा आहारामध्ये समावेश वाढताना दिसत आहे.
यामुळे विविध आजार आणि आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. जर तुम्हाला कायम आणि दीर्घकाळ हेल्दी रहायचं असेल तर तुम्हाला आहाराच्या चांगल्या सवयी लावणं गरजेंच आहे. केवळ कधीतरी एखाद्या वेळीस काही चांगले पदार्थ खावून निरोगी राहणं शक्य नाही.
यासाठी तुम्हाला दैनंदिन आहारामध्ये काही पोषक तत्व असलेल्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे.
असे अनेक पदार्थ आहेत जे तुम्ही तुमच्या नाश्त्यामध्ये, दुपारच्या जेवणात किंवा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. या पदार्थांमधून तुम्हाला मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्व मिळाल्याने दीर्घकाळ निरोगी राहण्यास मदत होईल.
पालक
पालकाची भाजी ही साधारण बाराही महिना बाजारामध्ये सहज उपलब्ध असते. पालकाचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. आयर्नने परिपूर्ण असलेल्या पालकाच्या सेवनामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही. त्याचप्रमाणे पालकामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, कॅल्शियम आणि फायबरसोबत इतर पोषक तत्व आढळतात.
पालकामधील पोषक तत्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते. तसंच पालकमधील ड जीवनसत्वामुळे हाडं, त्वचा आणि केस निरोगी राहण्यास मदत होते.
डाळी
भारतीय स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात डाळींचा समावेश केला जातो. सर्व प्रकारच्या डाळींचे आरोग्यासाठी विविध फायदे आहेत. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, फायबर, आयरन आणि फाॅलेट उपलब्ध असतं. यासाठी रोजच्या आहारामध्ये डाळींचा समावेश करणं गरजेचं आहे.
तुम्ही आहारामध्ये मूगडाळ, मसूरडाळ, मटकी डाळ. तूर डाळ अशा विविध डाळींच्या आमटीचा समावेश करू शकता. त्याचसोबत नाश्त्यासाठी मिक्स डाळींचे डोसे, अप्पे हे पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता.
सुकामेवा
ड्राय फ्रूट्स म्हणजेच सुकामेवा आरोग्यासाठी उपयुक्त आहे. खास करून बदाम, अक्रोड, पिस्ता यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि गुड फॅट्स उपलब्ध असतात. सुक्यामेवामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते, रक्तप्रवाह चांगला राहतो तसंच रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होते.
सुकामेवाचं सेवन मेंदूच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यामुळे हॅपी हार्मोन सक्रिय होतात. परिणामी ताण-तणाव कमी होण्यास मदत होते. सुकामेवा हे एक हेल्दी स्नॅक आहे.
ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, झिंक, आयरन, कॅल्शियम आणि प्रोटीन उपलब्ध असतं. तसंच यात असलेल्या पॉलीफिनॉल, ग्लूकोसाइड आणि क्वेरसेटिन यांसारख्या पोषक तत्वांमुळे मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.
ब्रोकोलीमधील व्हिटॅमिन सी आणि झिंकमुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामध्ये कर्करोगविरोधी आणि हेपेटोप्रोटेक्टिव्ह घटक असतात ज्यामुळे यकृताचं आरोग्य चांगल राहतं. वजन कमी करण्यासाठी देखील ब्रोकोलीचं सेवन फायदेशीर ठरतं.
रताळं
उपवासासाठी अनेकजण रताळ्याचे वेगवेगळे पदार्थ खात असतात. मात्र रताळ्याचा तुम्ही दैनंदिन आहारामध्ये देखील समावेश करू शकता. रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स उपलब्ध असतात. डोळे निरोगी राहण्यासाठी आणि इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी रताळं फायदेशीर ठरतं.