टीम इंडियाला मोठा धक्का, अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या पुनरागमनाचं स्वप्न भंगलं, कोणाची एन्ट्री?

भारतीय क्रिकेट संघातील स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या २०२३ च्या वनडे क्रिकेट विश्वचषकातून बाहेर पडला आहे. बांगलादेशविरुद्धच्या लढतीत घोट्याला दुखापत झाल्यामुळे पंड्याचा प्रवास इथेच थांबत आहे. हार्दिक पंड्याला पुढील सर्व सामन्यांना मुकावे लागण्याची चर्चा असताना काही मीडिया रिपोर्ट्समध्ये मात्र हार्दिक नॉकऑफ सामन्यांच्या वेळेत तंदुरुस्त होऊन पुनरागमन करु शकतो, असा दावा केला जात होता. परंतु तोही आता फोल ठरताना दिसत आहे.

हार्दिक पंड्याच्या जागी प्रसिध कृष्णाची संघात निवड करण्यात आली आहे. या बदलाला शनिवारी विश्वचषकाच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने मान्यता दिली आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एका निवेदनात म्हटले आहे.
जलदगती गोलंदाज प्रसिध कृष्णा आता हार्दिकची कमतरता भरुन काढणार का, याची उत्सुकता क्रिकेट रसिकांना आहे. लम्बर स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे प्रसिधला आयपीएल २०२३ ला ही मुकावे लागले होते. त्यानंतर वनडे विश्वचषकात आपला जलवा दाखवण्याची त्याची इच्छा होती.

हार्दिकला बांगलादेशच्या सामन्यात खेळताना दुखापत झाली होती. मैदानात गोलंदाजी करताना तो जायबंदी झाला होता. त्यामुळे त्याला मैदानही सोडावे लागले. त्यानंतर हार्दिक मैदानात दिसला नाही. त्यामुळे हार्दिकसारखा अष्टपैलू खेळाडू कधी संघात येणार, याची चाहत्यांना उत्सुकता होती.

विश्वचषकादरम्यान १५ सदस्यीय संघात कोणतेही बदल करण्यासाठी इव्हेंट टेक्निकल कमिटीची मंजुरी आवश्यक असते. त्यानंतर नवीन खेळाडू अधिकृतपणे संघात सामील होतो.

क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या इव्हेंट टेक्निकल कमिटीमध्ये वसीम खान (आयसीसी महाव्यवस्थापक), ख्रिस टेटली, हेमांग अमीन, गौरव सक्सेना, रसेल अर्नोल्ड आणि सायमन डौल यांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने