भारत चार डिसेंबरला ‘नौदल दिन’ का साजरा करतो? या दिवशी नेमकं काय घडलं होतं?

नौदलातील युद्धनौकांची संख्या आणि नौसैनिकांची संख्या लक्षात घेतली तर जगातील चौथ्या क्रमांकाचे नौदल म्हणून भारतीय नौदलाची ओळख आहे. ३५ प्रमुख युद्धनौका आणि दोन अणुउर्जेवर कार्यरत असलेल्या पाणबुड्यांसह भारतीय नौदलाच्या ताफ्यात सध्या १५० विविध प्रकराच्या युद्धनौका कार्यरत आहेत. भारताच्या तिन्ही बाजूंना पसरलेला अथांग समुद्र, या भागातून तसंच पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत विविध ठिकाणी विशेषतः आखातांमधून सुरु असलेली जलवाहतूक, चीनचे वाढते वर्चस्व यामुळे गेल्या काही वर्षात भारतीय नौदलाने कात टाकली आहे.

तीन हजार वर्षांपासून इतिहासतील विविध राजे-घराणे इथपासून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नौदल ते पुढे सध्याचे आधुनिक नौदलाने असा भारतीय नौदलाचा दबदबा राहिला आहे. विशेषतः ४ डिसेंबर १९७१ या दिवशी नौदलाने दिलेल्या दणक्याने पाकिस्तानच्या नौदलाचे कंबरडे मोडले, भारतीय नौदलाचे नाणे जगात खणखणीत वाजले.
नौदलाची आगेकूच

१९७१ या वर्षाच्या सुरुवातीपासून भारत पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले होते. तीन डिसेंबरच्या संध्याकाळी पाकिस्तानने पश्चिमेकडील भारताच्या हद्दीत वायू दलाच्या विविध तळांवर हल्ले केले आणि युद्धाला सुरुवात केली.

चार डिसेंबरच्या रात्री भारताच्या युद्धनौकांचा समूह पाकिस्तानच्या युद्दनौकांना, रडार यंत्रणांना चकवत कराची बंदरापासून सुमारे ४६० किलोमीटर अंतरावर येऊन स्थिरावला. या समुहात तीन विद्युत वर्गातील क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका ( Vidyut-class missile boat – INS Nipat, INS Nirghat and INS Veer ), दोन कॉर्वेट (Corvette) प्रकारातील युद्धनौका (INS Kiltan and INS Katchall) आणि इंधनवाहू टँकर (INS Poshak ) यांचा समावेश होता.

युद्धनौकांचा निर्णायक हल्ला

रात्री हळूहळू नियोजित पद्धतीने युद्धनौकांनी कराचीकडे आगेकूच करायला सुरुवात केली. किनाऱ्यापासून ७० किलोमीचर अंतरावर INS Nirghat ने क्षेपणास्त्र डागत PNS Khaibar या पाकिस्तानच्या युद्धनौकेला जलसमाधी दिली. INS Nipat या युद्धनौकेने क्षेपणास्त्र हल्ला करत PNS Shah Jahan नावाच्या युद्धनौकेचे नुकसान केले आणि एका मालवाहू जहाजाला बुडवले. INS Veer ने क्षेपणास्त्र डागत PNS Muhafiz ही युद्धनौका बुडवली. INS Nipat पुढे आगेकूच करत कराची बंदराजवळ अवघ्या २६ किलोमीटर एवढ्या अंतरावर पोहचत क्षेपणास्त्र डागली, ज्यामध्ये बंदरातील इंधन साठ्याचे मोठे नुकसान झाले.

या संपूर्ण मोहिमेला Operation Trident असं नाव देण्यात आले होते. एवढंच नाही तर असा हल्ला केल्यावर पुन्हा चार दिवसांनी म्हणजेच आठ-नऊ डिसेंबरच्या रात्री Operation Python मोहिम राबवत भारतीय नौदलाच्या तीन युद्धनौकांनी कराची बंदरावर पुन्हा हल्ला करत पाकिस्तानच्या एका इंधनावाहू युद्धनौकेचे नुकसान केले तर कराची बंदरातील आणखी एका इंथन साठा उद्ध्वस्त केला.

पाकिस्तान नौदल हादरले

या दणक्याने पाकिस्तान त्याचे नौदल हे पश्चिम भागातच म्हणजे कराची बंदराच्या आसपास ठेवू शकला, कराची बंदरात पाकिस्तानच्या युद्धनौकांना इंधनाची मोठी कमतरता जाणवली, त्यांना पुढे सरकता आले नाही. त्यामुळेच दुसरीकडे पूर्व पाकिस्तान ( आत्ताचे बांगलादेश ) च्या समुद्रात भारतीय नौदलाला पुर्णपणे वर्चस्व राखण्यास एकप्रकारे मदत झाली.

जगातील नौदलांच्या इतिहासात चार डिसेंबर १९७१ चा भारतीय नौदलाने कराची बंदरावर केलेला हल्ला ही एक धाडसी कारवाई मानली जाते. १९७१ च्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धामधील विजयात ते एक सोनेरी पान आहे. यामुळेच १९७२ पासून ४ डिसेंबर हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने