नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अमेरिकन टीवी शो फ्रेंड्समधील चँडलरची भूमिका करणारा मॅथ्यू पेरीचे काही दिवसांपुर्वी निधन झाले होते. मॅथ्यू पेरीचा वयाच्या ५४ व्या वर्षी मृत्यू झाल्याने चाहत्यांना धक्का बसला होता.
अभिनेता मॅथ्यू पेरीचा मृतदेह राहत्या घरी आढळला. मॅथ्यूचा मृतदेह घरातील जकुजीमधे बुडालेल्या अवस्थेत सापडल्याने त्याच्या मृत्युचं नेमकं कारण याबाबत अनेक चर्चा होत्या.
आता मॅथ्यू पेरीच्या मृत्यूशी संबंधित वैद्यकीय अहवाल शुक्रवारी समोर आला आहे. यात मॅथ्यूच्या मृत्यूचे कारण समोर आले आहे. केटामाईनच्या ओव्हर डोसमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
लॉस एंजेलिसच्या काउंटी वैद्यकीय परीक्षक कार्यालयाने त्याच्या मृत्यूचे कारण बुडणे, कोरोनरी धमनी रोग आणि अपघात म्हणून नोंद केले आहे. त्याच्या मृत्यूच्या आधीच्या तपासात घटनास्थळी कोणतेही ड्रग्स आढळले नाहीत, परंतु त्याच्या घरी प्रिस्क्रिप्शन औषधे सापडली आहेत.
रिपोर्टनुसार, पेरीच्या रक्तातील केटामाइनची पातळी जास्त होती. केटामाइन हे शस्त्रक्रियेमध्ये भूल देण्यासाठी वापरलं जाते. त्याच्या अती सेवनाने पेरीच्या हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छवासाचा वेग वाढला आणि तो बेशुद्ध झाला, त्यानंतर पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
फ्रेंड्स'मधून मिळाली प्रसिद्धी
मॅथ्यूज 'बेव्हरली हिल्स 90210' आणि 'अ नाइट इन द लाइफ ऑफ जिमी रीअर्डन' मध्ये देखील दिसला होता. पण त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती टीव्ही सिटकॉम 'फ्रेंड्स'मधून.
ही मालिका 22 सप्टेंबर 1994 रोजी सुरू झाली आणि 6 मे 2004 रोजी संपली. या काळात 236 भागांसह 'फ्रेंड्स'चे दहा सीझन आले.
त्याने फुल्स रश इन, ऑलमोस्ट हीरोज, द होल नाइन यार्ड्स, 17 अगेन आणि द रॉन क्लार्क स्टोरी यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.